< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); फिडे महिला ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरू हम्पीला विजेतेपद – Sport Splus

फिडे महिला ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरू हम्पीला विजेतेपद

  • By admin
  • April 24, 2025
  • 0
  • 46 Views
Spread the love

पुणे : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित फिडे महिला ग्रँड प्रिक्स (ग्रां-प्री) बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्यातील स्पर्धेतील पहिल्या दोन सर्वोच्च मानांकित खेळाडू भारताची अव्वल महिला बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी व चीनची झू जीनर या दोघींनी नवव्या फेरीत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर विजय मिळवल्यामुळे झालेल्या गुण बरोबरी नंतर हम्पी हिने टायब्रेकर गुणांच्या आधारावर विजेतेपद संपादन केले.

अमनोरा द फर्न येथे पार पडलेल्या या स्पर्धेत नवव्या फेरीत कोनेरू हम्पीने सालिनोव्हा न्यूरघ्युनवर तर, झू जीनरने पोलिना शुव्हालोवावर निर्णायक विजय मिळवल्यावर हम्पी व जीनर या दोघीही ७ गुणांसह संयुक्तरित्या आघाडीवर राहिल्या. त्यामुळे विजेतेपद निश्चित करण्यासाठी टाय ब्रेकर गुणांचा अवलंब करण्यात आला. त्यामध्ये हम्पी हिने बाजी मारली.

मात्र, विजेतेपदाची पारितोषिक रक्कम व ग्रां-प्री मानांकन गुण दोघींनाही विभागून देण्यात आले. दोघींनीही या स्पर्धेतून प्रत्येकी ११७.५ मानांकन गुणांची कमाई केली. या स्पर्धा मालिकेतील अखेरचा सहावा टप्पा पुढच्या महिन्यात ऑस्ट्रिया येथे होणार आहे.

वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश देण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या १९ वर्षीय दिव्या देशमुख हिने चार विजय तीन बरोबरी आणि २ पराभव अशा कामगिरी सह ५.५ गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. तिचे दोन पराभव हम्पी व जीनर यांच्याविरुद्धच होते.

तत्पूर्वी, हम्पी विरुद्ध सालिनोव्हा न्यूरघ्युन हिने स्लाव्ह बचावाचा वापर करुन सुरुवात केली. मात्र, हम्पी हिने पहिल्यापासूनच आक्रमक दिसत होती. हम्पीने आपला उंट न्यूरघ्युनच्या राजाच्या बाजूला अशा ठिकाणी बसविला की, न्यूरघ्युनला कॅस्लिंग करता आले नाही. न्यूरघ्युन हिने १६व्या चालीत धोका पत्करून हत्ती पुढे आणला. मात्र, हम्पीवर त्याचा परिणाम झाला नाही. तिने १९व्या चालीनंतर न्यूरघ्युनच्या राजावर दडपण आणून संपूर्ण आक्रमक भूमिका घेतली. दोघींमधील ही लढत काही काळ चुरशीची झाली, मात्र हम्पी हिने ८४व्या चालीत विजयाची पूर्तता केली.

जीनर विरुद्ध पोलिना हा डाव इटालियन ओपनिंगमुळे रंगतदार ठरला. मात्र, जीनरने संपूर्ण डावावर वर्चस्व मिळवत ७६व्या चालीत विजयाची नोंद केली.

आणखी एक सामन्यात एलिना कॅशलीनस्कायाने दिव्या देशमुख विरुद्ध फ्रेंच बचावाने प्रारंभ केला. मात्र, दोघींनीही पटावर बरोबरी राखत ४२ चाली नंतर सामना अनिर्णित ठेवला.

कँडिडेट स्पर्धेसाठी अलेक्सेंड्रा गोरायचिंका ३०८.८ गुणांसह अव्वल स्थानासह आपला प्रवेश निश्चित केला असून हम्पी २७९.१७ गुणांसह तिच्या पाठोपाठ आहे.

यावेळी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ परिणय फुके म्हणाले की, फिडेच्या महिला ग्रँड प्रिक्स सारख्या महत्वाच्या स्पर्धेचे आयोजन करायला मिळणे ही महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेसाठी अभिमानाची बाब आहे. भारत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील अधिक स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी उत्सुक आहे. या स्पर्धेच्या आयोजनाने एक पाऊल पुढे पडले आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम महिला खेळाडूंचा खेळ पहायला मिळाला. भारताच्या कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावली, आर वैशाली सारख्या प्रमुख खेळाडू या स्पर्धेत खेळल्यामुळे देशातील युवा खेळाडूंना निश्चित प्रेरणा मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखली भारत क्रीडा क्षेत्रात प्रगती करत आहे, नवी उंची गाठत आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असाच विकास होत आहे. महाराष्ट्रात सेच स्कूल योजना राबविण्याचा आम्ही विचार करत आहोत. लवकरच ही योजना प्रत्यक्षात येईल.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ परिणय फुके, एमसीएचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एआयसीएचे सहसचिव मनीष कुमार, एमसीएचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, एमसीएचे मानद सचिव निरंजन गोडबोले, चीफ आरबीटर इव्हान सायरोव आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *