१५० वर्षे नाबाद : बॉम्बे वायएमसीएची समाजसेवा आणि क्रीडाक्षेत्रातील समृद्ध परंपरा!

  • By admin
  • April 24, 2025
  • 0
  • 8 Views
Spread the love

एनसीपीए येथे सोहळा, राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि वायएमसीएच्या जागतिक अध्यक्षा सोहेला हायेक यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई : बॉम्बे वायएमसीए (यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन) ही नामांकित संस्था समुदायाचे सशक्तीकरण, जीवनाचे रुपांतरण तसेच सेवा, क्रीडा आणि सामाजिक बदल या क्षेत्रांमध्ये १८७५ पासून निरंतर कार्यरत आहे. या संस्थेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती होत आहे. दीडशेव्या वर्धापन दिनाचा हा ऐतिहासिक कार्यक्रम शुक्रवारी (२५ एप्रिल) जमशेद भाभा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉइंट, मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे प्रमुख पाहुणे आणि वायएमसीएच्या जागतिक अध्यक्षा सोहेला हायेक हे सन्माननीय अतिथी म्हणून म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जागतिक वायएमसीए मोहिमेतील अनेक नामवंत, राष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या व्यक्ती, भागधारक आणि शुभेच्छुक या कार्यक्रमाला हजेरी लावतील, अशी माहिती बॉम्बे वायएमसीएचे अध्यक्ष नोएल अमन्ना यांनी दिली.

‘‘मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरात सामाजिक भान बाळगून दीडशे वर्षे अथक सेवा करण्याचे कार्य बॉम्बे वायएमसीएने केले आहे. क्रीडा क्षेत्रातील पाठबळ आणि युवकांच्या वसतिगृहांची मुहूर्तमेढ रोवण्यापासून ते सर्वसमावेशक जागा, निवारे आणि शैक्षणिक उपक्रम उभारण्यापर्यंतचे संस्मरणीय कार्य संस्था करीत आली आहे. केवळ कसोटीच्या कालखंडातच नव्हे, तर पिढ्यान्पिढ्या मुंबईकरांच्या जडणघडणीतही संस्थाने मोलाची भूमिका बजावली आहे,’’ असे बॉम्बे वायएमसीएचे सरचिटणीस ऑलिन कोटियन यांनी सांगितले.

बॉम्बे वायएमसीएची स्थापना २५ एप्रिल, १८७५ या दिवशी धोबी तलावच्या फ्रामजी कावसजी हॉलमध्ये झाली. आधुनिकतेच्या उंबरठ्यावरील वसाहती शहरातील तरुणांच्या आध्यात्मिक आणि लौकीक गरजा पूर्ण करणे हा संस्थेचा प्राथमिक उद्देश होता. नियमित प्रार्थना करणाऱ्या १८८ जणांच्या समूहाने ही संस्था सुरू केली. यात २० भारतीयांचा समावेश होता. अगदी प्रारंभीच्या दिवसांतही सर्वसमावेशकता आणि श्रद्धेच्या मूल्यांचे प्रतिबिंब संस्थेच्या कार्यात दिसून येत होते. भारतीय बास्केटबॉल खेळाच्या वाटचालीत वायएमसीएचा सिंहाचा वाटा आहे, हे सर्वश्रुत आहे.

वायएमसीएचे मार्गदर्शक जेम्स नॅस्मिथ यांनी अमेरिकेत या खेळाचा शोध लावला. मुंबईत त्यावेळी संघटनेने ही क्रीडात्मक मशाल सदैव धगधगत ठेवली. कालांतराने फुटबॉल, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक्स आणि नंतरच्या काळात जलतरण आणि बिलियर्ड्स या क्रीडा प्रकारांकडेही विशेष लक्ष पुरवले.

बॉम्बे वायएमसीएने १९१४मध्ये आपला शारीरिक शिक्षण विभाग सुरू केला आणि १९२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा पहिला ऑलिम्पिक चमू धाडण्याच्या मोहिमेत महत्त्वाचे योगदान दिले. वायएमसीएने पहिले वसतिगृह (हॉस्टेल) १८९०मध्ये सुरू केले. युवा नोकरदार पुरुषांसाठी परवडणाऱ्या किंमतीत सुरक्षित निवासव्यवस्था पुरवण्यात आली. आजमितीला वायएमसीएच्या साखळीतील वसतिगृहे ही शहरातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि उदयोन्मुखांसाठी आश्रयस्थाने आहेत. १९७२मध्ये बॉम्बे वायएमसीएच्या मुख्यालयाचे अपोला बंदर येथून वायएमसीए इंटरनॅशनल हाऊस, मुंबई सेंट्रल येथे स्थलांतर झाले. या प्रशस्त जागेत निवास व्यवस्था, प्रशिक्षक केंद्र आणि समुदायाचे कार्यक्रम करण्याची क्षमता होती. त्यानंतर ‘शरण’ हा नवा उपक्रम वायएमसीएने राबवला. मुंबई महानगरपालिकेच्या साहाय्याने अंधेरीमधील साकीनाका परिसरात ३२ खाटांची तात्पुरती निवास व्यवस्था उभी केली. शहरातील विकासकार्याच्या पलीकडे लोणावळानजीक कान्हे येथे एक प्रेरणादायी ग्रामीण उपक्रमसुद्धा संस्थेकडून राबवला जात आहे. हे व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आसपासच्या गावांमधील तरुण आणि महिलांसाठी जीवनरेखा बनले आहे.

“बॉम्बे वायएमसीएची दीडशे वर्षांची वाटचाल ही प्रार्थना, श्रद्धेची ताकद, समर्पण, सेवा आणि समुदाय यांची साक्षीदार आहे. १८७५ साली स्थापन झाल्यापासून आजपर्यंत आम्ही युवकांचा सर्वांगीण विकास, कुटुंबाचे सशक्तीकरण, सामाजिक परिवर्तन घडविणे आणि अधिक समावेशक व समताधारित समाज निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. या ऐतिहासिक टप्प्याचा उत्सव साजरा करताना, आम्ही आमच्या ध्येयाशी नव्याने बांधिलकी व्यक्त करतो. समर्थ व्यक्तिमत्व, समर्थ कुटुंबे आणि समर्थ समुदाय घडविण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. हे वर्ष केवळ आमच्या भूतकाळाचा उत्सव नसून वर्तमानातील बांधिलकी आणि भविष्याची आश्वासक प्रतिज्ञा आहे.” असे बॉम्बे वायएमसीएचे अध्यक्ष नोएल अमन्ना यांनी सांगितले.

‘‘आमचे उपक्रम बौद्धिक, शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाह क्रीडा, शिक्षण, आपत्ती निवारण तसेच समुदाय कल्याण यावर आधारित असतात. आमच्या सामुदायिक प्रकल्पांमध्ये बालवाडी, रात्र अभ्यास केंद्र, मुलांसाठी आणि महिलांसाठी निवारा, शिष्यवृत्ती आणि कुटुंब सेवांचा समावेश आहे. व्यक्ती, समुदाय आणि समाजाचे जीवनमान उंचावणे हाच त्याचा प्रमुख उद्देश आहे,’’ अशी माहिती बॉम्बे वायएमसीएचे सरचिटणीस ऑलिन कोटियन यांनी दिली.

‘‘स्वयंसेवककेंद्रीत आणि मूल्याधारित ही संस्था ‘टू गॉड अलोन’ म्हणजेच ‘फक्त देवासाठी’ या विचारप्रणालीशी बांधिल आहे. क्रीडात्मक विकासासाठी पाठबळ आणि वसतिगृह निवास व्यवस्था उपलब्ध करण्यापासून ते शिक्षण, बालवाडी, मुलांसाठी निवारा आणि महिला सक्षमीकरणाला पाठिंबा देण्यापर्यंत आमच्या योगदानाने सर्व धर्म, वर्ग आणि पिढ्यांमधील जीवनांना बळ दिले आहे,’’ असे बॉम्बे वायएमसीएचे उपाध्यक्ष मायकेल मॅन्युअल राज यांनी मांडले आहे.

१५० वर्षांचा हा सेवाव्रताचा टप्पा गाठताना, बॉम्बे वायएमसीए अजूनही दीपस्तंभाप्रमाणे कार्यरत आहे. व्यक्ती आणि समाजाला सशक्त करून, त्यांना यशस्वी होण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करण्यासाठी ही संस्था प्रेरणा देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *