पुणे ः विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील करिअरच्या संधी, खेळाडूंची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, क्रीडा शिष्यवृत्त्या, खेळाडूंचे आहार, क्रीडा माध्यमातून नेतृत्व, वेळेचे व्यवस्थापन इत्यादी बाबत माहिती होण्यासाठी २६ व २७ एप्रिल रोजी मिलेनियम स्कूल कर्वेनगर येथे दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेमध्ये अनेक दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि तज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळेमध्ये विविध शाळांमधील शंभरहून अधिक विद्यार्थी, त्यांचे शिक्षक आणि पालक उपस्थित राहणार आहेत.
रायला (रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड्स) या उपक्रमाअंतर्गत आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन २६ एप्रिल २०२५ रोजी मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार विजेते ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे. याच दिवशी क्रीडा क्षेत्रातील शिष्यवृत्ती व करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर विपुल लुनावत, खेळाडूंचे आहार याबाबत डॉ पूजा ग्वालिया, क्रीडा क्षेत्रात व्यायाम व तंदुरुस्तीचे महत्व याविषयी डॉ प्रमोद पाटील यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
२७ एप्रिल २०२५ रोजी क्रीडा पत्रकारिते मधील करिअरच्या संधी याविषयी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आशिष पेंडसे, क्रीडा माध्यमातून नेतृत्व याविषयी डॉ अनंत सरदेशमुख, वेळेचे व्यवस्थापन याविषयी डॉ पोर्णिमा गौरी, क्रीडा मानसशास्त्राविषयी गायत्री वर्तक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. याच दिवशी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू अनिकेत कोपरकर व त्यांचे प्रशिक्षक खेळाडूच्या विकासात कुटुंबीयांचे योगदान याविषयी सुसंवाद साधला जाणार आहे.
या कार्यशाळेचे आयोजन रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोडचे अध्यक्ष रोटेरियन पराग गाडगीळ, सेक्रेटरी रोटेरियन देवदत्त हंबर्डीकर, रोटेरियन गिरीश ब्रम्हे व रोटेरियन स्वाती पाटील यांनी केले आहे.