
नवी दिल्ली ः भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि भाजपचे माजी खासदार गौतम गंभीर यांना ‘आयसिस काश्मीर’ या दहशतवादी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर गंभीरने दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आणि त्वरित कारवाईची मागणी केली. राजेंद्र नगर पोलिस स्टेशनचे एसएचओ आणि मध्य दिल्लीचे डीसीपी यांच्या मते, गंभीरने औपचारिकपणे एफआयआर नोंदवण्याची विनंती केली.
गौतम गंभीरने कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांना त्याच्या कुटुंबाची आणि जवळच्या लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आवाहनही केले. धमकीचे गांभीर्य लक्षात घेता, दिल्ली पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करतील आणि गंभीर आणि त्याच्या प्रियजनांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी योग्य पावले उचलतील.
गंभीरला दोन धमकीचे ईमेल
अहवालानुसार, गंभीरला २२ एप्रिल रोजी दोन धमकीचे ईमेल आले. एक ईमेल दुपारी आणि दुसरा संध्याकाळी आला. दोघांवरही “आय किल यू” असा संदेश लिहिलेला होता. गंभीरला अशा धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. नोव्हेंबर २०२१ मध्ये खासदार असताना त्यांनाही असाच एक ईमेल आला होता.
गंभीर याने मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. पहलगाम मधील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात दोन परदेशी नागरिकांसह २६ नागरिकांचा मृत्यू झाला. २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतरची ही सर्वात वाईट घटनांपैकी एक बनली. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा एक गट असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. गंभीर याने मेसेजवर लिहिले होते, ‘मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना.’ यासाठी जबाबदार असलेल्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. भारत हल्ला करेल.
दहशतवादी हल्ल्याचा निषेध
गंभीर व्यतिरिक्त, इतर अनेक क्रिकेटपटूंनी देखील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. यामध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सूर्यकुमार यादव या क्रिकेटपटूंचा समावेश आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी यांनी पाकिस्तानसोबतचे क्रीडा संबंध पूर्णपणे संपुष्टात आणण्याची मागणी केली. त्याचवेळी, तेंडुलकरने लिहिले की, ‘पीडित कुटुंब अकल्पनीय वेदनामधून जात असतील. या कठीण काळात भारतातील आणि जगभरातील लोक त्यांच्यासोबत आहेत. या हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि न्याय मिळावा अशी प्रार्थना करतो. विराट कोहली याने इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘शोकग्रस्त कुटुंबाप्रती मनापासून संवेदना. या भ्याड हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसाठी मी प्रार्थना करतो आणि त्यांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना करतो.