
दहावी मित्सुई शोजी टी २० क्रिकेट लीग : मोहित अवस्थी, आर्यराज निकम सामनावीर
मुंबई : शिवाजी पार्क वॉरियर्स संघाने घाटकोपर जेट्स विरुद्ध १९ धावांनी विजय मिळवत ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि एमसीसी आयोजित १०व्या मित्सुई शोजी टी २० क्रिकेट स्पर्धेच्या सुपर लीग स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नोंद केली. वेगवान गोलंदाज मोहित अवस्थी हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
१८ षटकांच्या या लढतीत प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आल्यानंतर शिवाजी पार्क वॉरियर्स संघाला ९ बाद १२० धावांचीच मजल मारता आली. पहिल्या १० षटकांत ५७ धावांत त्यांचा निम्मा संघ तंबूत परतला होता. मात्र अग्नी चोप्रा (३२) आणि नंतर सिद्धांत सिंग (२४) आणि मोहित अवस्थी (नाबाद ११) यांनी आठव्या विकेटसाठी ३१ धावांची भर घातल्यामुळे त्यांना किमान ९ बाद १२० धावा करता आल्या. घाटकोपर जेट्स संघासाठी धनीत राऊत २७ धावांत ४ बळी) आणि प्रतीक मिश्रा (३० धावांत २ बळी) या मध्यमगती गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली.

या आव्हानाचा पाठलाग करताना घाटकोपर जेट्स संघाच्या एकाही फलंदाजाने खेळपट्टीवर टिकून राहण्याची क्षमता दाखवली नाही. केवळ २७ धावांत त्यांचा निम्मा संघ तंबूत परतला होता. सौरभ सिंग (२१) आणि धानीत राऊत (२४) या जोडीने सातव्या विकेटसाठी डावातील सर्वाधिक ४५ धावांची भागी रचली पण संघाला विजयी करण्यासाठी ती पुरेशी ठरली नाही आणि त्यांचा डाव १४.५ षटकांत १०१ धावांत गुंडाळला गेला. मोहित अवस्थी (२७ धावांत ३) आणि आश्रय सजणानी (१५ धावांत ३ बळी) या मध्यमगती गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना स्थिरावण्याची संधीच दिली नाही आणि डावखुरा फिरकी गोलंदाज सचिन गुप्ता याने २५ धावांत २ बळी मिळविले. मोहित अवस्थीच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
घाटकोपर जेट्सला काल मुंबई पोलीस सिटी रायडर्स विरुद्ध देखील पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचे आव्हान जवळ-जवळ संपुष्टात आले आहे. मुंबई पोलीस विरुद्ध त्यांनी प्रथम फलंदाजी करताना १७ षटकांत ८ बाद १२७ धावा केल्या. आकाश आनंद (३०) आणि जय जैन (नाबाद ४०) यांचा अपवाद वगळता त्यांचे अन्य फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. सागर मिश्रा (१८ धावांत ४ बळी) आणि आर्यराज निकम (५ धावांत २ बळी) या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. मुंबई पोलीस सिटी रायडर्स संघाने हे आव्हान ११,४ षटकांत केवळ दोन विकेट्स गमावून पूर्ण केले. सुनील पाटील (३०), आर्यराज निकम (नाबाद ४५) ऋतुराज साने (नाबाद २५) आणि हर्ष साळुंखे (२१) यांनी फलंदाजीत योगदान देत संघाचा विजय साकारला. आर्यराज निकम याच्या अष्टपैलू खेळीमुळे त्याचीच सामन्यातील सर्वोत्तोम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
संक्षिप्त धावफलक ः १) शिवाजी पार्क वॉरियर्स ः १८ षटकांत ९ बाद १२० (हार्दिक तामोरे १३, अग्नी चोप्रा ३२, सिद्धांत सिंग २४, मोहित अवस्थी नाबाद ११; धनीत राऊत २७ धावांत ४ बळी, प्रतीक मिश्रा ३० धावांत २ बळी) विजयी विरुद्ध घाटकोपर जेट्स १४.५ षटकांत सर्वबाद १०१ ( सौरभ सिंग २१, धनीत राऊत २४; मोहित अवस्थी २७ धावांत ३ बळी, आश्रय सजणानी १५ धावांत ३ बळी, सचिन गुप्ता २५ धावांत २ बळी). सामनावीर ः मोहित अवस्थी.
२) घाटकोपर जेट्स ः १७ षटकांत ८ बाद १२७ (आकाश आनंद ३०, जय जैन नाबाद ४०; आर्यराज निकम ५ धावांत २ बळी, सागर मिश्रा १८ धावांत ४ बळी) पराभूत विरुद्ध मुंबई पोलीस सिटी रायडर्स ः ११.४ षटकांत २ बाद १३१ (सुनील पाटील ३०, आर्यराज निकम नाबाद ४५, हर्ष साळुंखे २१, ऋतुराज साने नाबाद २५). सामनावीर ः आर्यराज निकम.