आरसीबी संघाचा सहावा विजय, मुंबई संघाला टाकले मागे 

  • By admin
  • April 24, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

विराट कोहली, देवदत्त पडिकल, जोश हेझलवूडची धमाकेदार कामगिरी
 
बंगळुरू : विराट कोहली (७०), देवदत्त पडिकल (५०) आणि जोश हेझलवूड (४-३३) यांच्या बहारदार कामगिरीच्या बळावर आरसीबी संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा ११ धावांनी पराभव केला. आयपीएल स्पर्धेतील आरसीबी संघाचा हा सहावा विजय ठरला. सहाव्या विजयासह आरसीबी संघाने १२ गुणांसह पुन्हा तिसरे स्थान मिळवले. 

राजस्थान रॉयल्स संघासमोर विजयासाठी २०६ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल व वैभव सूर्यवंशी या सलामी जोडीने ५२ धावांची भागीदारी करुन संघाला सुरेख सुरुवात करुन दिली. भुवनेश्वर कुमारने वैभवला १६ धावांवर क्लीन बोल्ड करुन पहिला धक्का दिला. त्याने २ षटकार मारले. यशस्वी जयस्वाल याने धमाकेदार ४९ धावांची खेळी केली. यशस्वीने अवघ्या १९ चेंडूत ४९ धावा फटकावल्या. त्याने तीन टोलेजंग षटकार व सात चौकार ठोकले. जोश हेझलवूड याने यशस्वीची विकेट घेऊन मोठा अडथळा दूर केला. कर्णधार रियान पराग याने १० चेंडूत २२ धावांची दमदार खेळी करत धावगती कायम ठेवली. परंतु, क़ृणाल पंड्याला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने दोन चौकार व दोन षटकार मारले. 

रियान पराग पाठोपाठ कृणाल पंड्याने नितीश राणाची २२ चेंडूतील २८ धावांची खेळी संपुष्टात आणली. राणाने तीन चौकार व एक षटकार मारला. भुवनेश्वरने त्याचा सुरेख झेल टिपला. १४व्या षटकात राणा बाद झाला तेव्हा राजस्थान संघाची स्थिती चार बाद १३४ अशी होती. 

ध्रुव जुरेल आणि हेटमायर या आक्रमक फलंदाजांवर मोठी भिस्त होती. हेटमायर ८ चेंडूत ११ धावा काढून बाद झाला. जुरेल याने ३४ चेंडूत ४७ धावांची बहारदार खेळी करत सामन्यातील रोमांच कायम ठेवला. त्याने तीन चौकार व तीन षटकार मारले. हेझलवूड याने जुरेल व आर्चर (०) यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करुन संघाची स्थिती भक्कम केली.  शेवटच्या दोन षटकात राजस्थानला १८ धावांची गरज होती. परंतु, हेझलवूड याने दोन विकेट घेऊन सामन्याचे चित्र बदलून टाकले. त्यामुळे शेवटच्या षटकात राजस्थानला १७ धावांची गरज होती. मात्र, राजस्थान संघ २० षटकात नऊ बाद १९४ धावा काढू शकला. ११ धावांनी आरआर संघाला पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या दोन षटकात सामन्याचा निकाल बदलला. जोश हेझलवूड याने ३३ धावांत चार विकेट घेऊन संघाला विजय मिळवून दिला.

आरसीबी संघाची दमदार फलंदाजी 

विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्या अर्धशतकी खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्ससमोर २०६ धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर आरसीबीने २० षटकांत पाच गडी गमावून २०५ धावा केल्या. या संघाविरुद्ध आरसीबीची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. विराट कोहलीने सर्वाधिक ७० धावांची खेळी खेळली. राजस्थानकडून संदीप शर्माने दोन तर जोफ्रा आर्चर आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

या सामन्यात फिल साल्ट आणि विराट कोहली यांनी आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी झाली. सातव्या षटकात वानिंदू हसरंगाने साल्टची विकेट घेतली. तो २३ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. यामध्ये चार चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर, विराट कोहलीला देवदत्त पडिकलची सुरेख साथ मिळाली.

दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी ५१ चेंडूत ९५ धावांची भागीदारी केली. यादरम्यान, आरसीबीच्या माजी कर्णधाराने ३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे आयपीएल कारकिर्दीतील ६० वे अर्धशतक आणि चालू हंगामातील पाचवे अर्धशतक आहे. ४२ चेंडूत ७० धावांची तुफानी खेळी खेळून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. या काळात त्याच्या बॅटमधून आठ चौकार आणि दोन षटकार लागले. त्याच वेळी, देवदत्त पडिक्कलने २७ चेंडूत ५० धावा केल्या. त्याच्याशिवाय टिम डेव्हिडने २३ धावा आणि रजत पाटीदारने एक धाव केली. याशिवाय जितेश शर्माने चार चौकारांसह २० धावा काढत नाबाद राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *