
देवगिरी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात
छत्रपती संभाजीनगर ः जीवनाच्या परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी संस्कृती, संस्कारासह वाचनक्षम बनले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
देवगिरी महाविद्यालय आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने देवगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. या पदवी वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य पंडितराव हर्षे हे होते. या प्रसंगी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य त्रिंबकराव पाथ्रीकर, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ आदित्य येळीकर, निमंत्रित सदस्य विवेक जैस्वाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ रवी पाटील, डॉ अपर्णा तावरे, डॉ गणेश मोहिते, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ शेखर शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती.
पदवी वितरण समारंभाच्या प्रारंभी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी केले. प्रास्ताविकपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासामध्ये देवगिरी महाविद्यालयाची भूमिका विशद केली. तसेच देवगिरी महाविद्यालय हे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पहिले स्वायत्त दर्जा असणारे महाविद्यालय आहे. या स्वायत्त दर्जाच्या माध्यमातून देवगिरी महाविद्यालयात रोजगाराभिमुख, संशोधन व विकासपुरक अभ्यासक्रम राबविले जातात असे विचार मांडले.
या पदवी वितरण समारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सध्या परिस्थितीमध्ये गुणांची टक्केवारी आणि गुणांचा फुगवटा यामधून विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण निर्माण होत आहे म्हणून देवगिरी महाविद्यालयामध्ये साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, विज्ञान यासंबंधी विशेष लक्ष दिले जाते. त्यामधून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होते ही महत्त्वाची बाब आहे. आजचा विद्यार्थी हा संस्कार आणि संस्कृती पासून दूर चालला आहे म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये आई-वडील आणि गुरुजन यांचे ऐकले पाहिजे. या माध्यमातून आजचा विद्यार्थी संस्कारक्षम, आरोग्यक्षम, तंत्रस्नेही याबरोबरच वाचन स्नेही बनला पाहिजे. वाचन संस्कृती वृद्धिंगत झाली पाहिजे. पालकांनी पण आपल्या कृतीतून वाचन संस्कृतीची जोपासना केली पाहिजे. खऱ्या अर्थाने जीवनाच्या परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम व वाचनक्षम बनले पाहिजे. आपले आई-वडील आणि गुरू यांच्या सल्ल्याने पुढील वाटचाल केली पाहिजे असे विचार व्यक्त करून पदवीधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
अध्यक्षीय भाषणात पंडितराव हर्षे यांनी देवगिरी महाविद्यालयाचे विद्यार्थी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली भूमिका यशस्वीपणे निभावतील असा विश्वास व्यक्त केला. या पदवी वितरण समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.
पदवी वितरण समारंभासाठी महाविद्यालयातील कला विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी, पालक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती. डॉ बाळासाहेब निर्मळ यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते यांनी आभार मानले.