
रेल्वेची स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धा – अमीर शेख सामनावीर
सोलापूर ः मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूटच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल क्रिकेट स्पर्धेतील अ गटाच्या सामन्यात साऊथ सोलापूर आपटे ग्रुप ब संघाने मास्टर क्रिकेट अकादमीवर ३९ धावांनी मात केली.
येथील रेल्वे मैदानावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना साऊथ सोलापूरने सर्वबाद २०९ धावा केल्या. विजयी २१० धावांचे लक्ष्य मास्टर क्रिकेट अकादमीस पेलवले नाही. त्यांचा डाव १७० धावांत आटोपला. अष्टपैलू खेळी करणारा अमीर शेख (६ बळी व ४४ धावा) सामन्याचा मानकरी ठरला. त्यास राजा पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. प्रत्येक सामनावीर पुरस्कार सुदेश व सुनील मालप यांच्याकडून देण्यात येत आहेत. पंच म्हणून दयानंद नवले व नितीन गायकवाड तर गुणलेखक म्हणून सचिन गायकवाड यांनी काम पाहिले.
संक्षिप्त धावफलक : १) साऊथ सोलापूर आपटे ग्रुप (ब) सोलापूर : ३९.२ षटकांत सर्वबाद २०९ (चेतन माढेकर ४६, आमिर शेख ४४, प्रेम कनले ३३ धावा, नवीन चिंता २ बळी, सर्वेश शीरुडे, ऋषिकेश चाटला, राज कोंढा, श्रेयस येमुल, राजेश येमुल व नितीकेश कंधी प्रत्येकी १ बळी) विजयी विरुद्ध मास्टर क्रिकेट अकॅडमी : ३१.२ षटकांत सर्वबाद १७० (राजेश येमुल ४७, आर्यन काळे नाबाद ३९, श्रेयस येमुल १९ धावा, आमिर शेख ६ विकेट, सुहान मकानदार ३ बळी).