
युनिव्हर्सल वन-डे लीग क्रिकेट ः शुभ मुथा सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर १६ एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत जाधव क्रिकेट अकादमी संघाने चॅम्पियन क्रिकेट अकादमी संघावर पाच विकेट राखून सहज विजय़ नोंदवला. या सामन्यात शुभ मुथा याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक राहुल पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन युनिव्हर्सल क्रिकेट ग्राउंडवर केले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने युवा खेळाडूंना एकदिवसीय सामना खेळण्याचा चांगला अनुभव प्राप्त होत आहे. त्यामुळे ही स्पर्धा युवा खेळाडूंना लाभदायक ठरत असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.
या सामन्यात चॅम्पियन क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चॅम्पियन अकादमीने २३.२ षटकात सर्वबाद ६४ धावा काढल्या. शुभ मुथाच्या प्रभावी आणि अचूक गोलंदाजीसमोर चॅम्पियन अकादमीचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. शुभ मुथा याने १७ धावांत चार विकेट घेऊन संघाला सामना जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. जाधव क्रिकेट अकादमीने ९.४ षटकात पाच बाद ६५ धावा फटकावत पाच विकेटने सामना जिंकत आगेकूच केली.

कमी धावसंख्येच्या या सामन्यात स्वामी याने ३८ चेंडूत २१ धावा काढल्या. त्याने दोन चौकार मारले. रुद्राक्ष कार्ले याने १६ चेंडूत १७ धावांची वेगवान खेळी केली. त्याने तीन चौकार ठोकले. मयूर सोमासे याने २१ चेंडूत १२ धावांचे योगदान दिले. त्याने दोन चौकार मारले. गोलंदाजीत शुभ मुथा याने १७ धावांत चार विकेट घेऊन सामना गाजवला. श्रेणिक दुधेडिया याने सहा धावांत दोन बळी घेतले. ध्रुव पुंड याने १५ धावांत दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः चॅम्पियन क्रिकेट अकादमी ः २३.२ षटकात सर्वबाद ६४ (साई ६, साहिल शेळके ५, स्वामी २१, रोहन जीवराग ६, इशांत बाबीरवाल नाबाद ५, इतर १५, शुभ मुथा ४-१७, ध्रुव पुंड २-१५, श्रेणिक दुधेडिया २-६, हर्षद शिंदे १-११) पराभूत विरुद्ध जाधव क्रिकेट अकादमी ः ९.४ षटकात पाच बाद ६५ (प्रणव उगले १०, रुद्राक्ष कार्ले १७, मयूर सोमासे १२, विनय नाबाद ४, जैद खान नाबाद १०, इतर ११, सुयोग घनवट १-२२, इशांत बाबीरवाल १-५). सामनावीर ः शुभ मुथा.