
कर्णधार श्रीवत्स कुलकर्णी, श्रीनिवास लेहेकर, जय हारदे, जैद पटेल, राम राठोडची लक्षवेधक कामगिरी
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर १९ सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने अॅम्बिशियस संघावर दहा विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. कर्णधार श्रीवत्स कुलकर्णी याने अप्रतिम कामगिरी बजावत संघाला विजय मिळवून दिला आणि सामनावीर पुरस्कार पटकावला.
ब्रिलियंट स्पोर्ट्स अकादमी मैदानावर हा सामना झाला. अॅम्बिशियस क्रिकेट अकादमीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ६१.४ षटकात सर्वबाद २४८ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात अॅम्बिशियस संघाने पहिल्या डावत २८.३ षटकात सर्वबाद ९५ धावा काढल्या. छत्रपती संभाजीनगर संघाने १५३ धावांची आघाडी घेतली. छत्रपती संभाजीनगर संघाने त्यांना फॉलोऑन दिला. अॅम्बिशियस संघ दुसऱया डावात ४२.४ षटकात १८१ धावांवर सर्वबाद झाला. छत्रपती संभाजीनगर संघाने अवघ्या १.३ षटकात बिनबाद २९ धावा फटकावत दहा विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. गेल्या काही सामन्यांपासून छत्रपती संभाजीनगर संघ ज्या आक्रमक डावपेचांसह क्रिकेट खेळत आहे त्या पद्धतीला या सामन्यात अखेर यश मिळाले.
या सामन्यात राम राठोड याने ५८ चेंडूत ६६ धावांची शानदार खेळी केली. त्याने आठ चौकार व तीन षटकार मारले. सुमीत केंगर याने ३९ चेंडूंचा सामना करत ५० धावा फटकावल्या. त्याने आठ चौकार व एक षटकार मारला. वेदांत हांचे याने ४५ धावा काढल्या. त्याने नऊ चौकार मारले.
गोलंदाजीत श्रीवत्स कुलकर्णी याने ३५ धावांत चार विकेट घेतल्या. ओमकार जाधव याने ७६ धावांत चार गडी बाद केले. श्रीनिवास लेहेकर याने ४९ धावांत तीन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक ः छत्रपती संभाजीनगर ः पहिला डाव ६१.४ षटकात सर्वबाद २४८ (राम राठोड ६६, रुद्राक्ष बोडके ७, जय हारदे ९, रोहित पाटील २१, राघव नाईक ४१, रुद्र सूर्यवंशी १५, श्रीवत्स कुलकर्णी २८, श्रीनिवास लेहेकर १५, अभिराम गोसावी नाबाद १२, जैद पटेल १३, अविनाश साह ८, इतर १३, ओमकार जाधव ४-७६, अर्जुन साळुंके २-३७, आर्यन जाधव १-२६, पृथ्वी सिंग १-३४, आदित्य कापरे १-२२, गौतम पुटेज १-२).
अॅम्बिशियस संघ ः पहिला डाव २८.३ षटकात सर्वबाद ९५ (वेदांत हांचे ४५, तेजस गिलबिले २५, आर्यन यादव ५, गौतम पुटेज ६, ओमकार जाधव ९, श्रीवत्स कुलकर्णी ४-३५, जय हारदे २-७, जैद पटेल १-१४, श्रीनिवास लेहेकर १-१२).
अॅम्बिशियस संघ ः दुसरा डाव ४२.४ षटकात सर्वबाद १८१ (वेदांत हांचे ४०, अभिनव केंगार १०, तेजस गिलबिले २०, सुमीत केंगार ५०, ओमकार जाधव ६, आदित्य कापरे २१, स्वराज्य थरकुडे नाबाद ८, इतर २०, श्रीवत्स कुलकर्णी ३-५३, श्रीनिवास लेहेकर ३-४९, जैद पटेल २-११, जय हारदे २-३४).
छत्रपती संभाजीनगर ः दुसरा डाव १.३ षटकात बिनबाद २९ (राम राठोड नाबाद २१, रुद्राक्ष बोडके नाबाद २, इतर ६) .