
नवमित्र क्रीडा मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कबड्डी स्पर्धा
मुंबई : ओम् साईनाथ ट्रस्ट, महालक्ष्मी मंडळ, विजय बजरंग, शताब्दी स्पोर्ट्स या संघांनी वरळीच्या नवमित्र क्रीडा मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या द्वितीय श्रेणी (ब) गटाच्या कबड्डी स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.
मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वरळी येथील वरळी स्पोर्ट्स क्लबच्या यशवंत साळवी मॅटच्या क्रीडांगणावर दीपक वेर्लेकर चषकाकरिता झालेल्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सामन्यात ओम् साईनाथ ट्रस्टने वीर संताजी मंडळाचा ४२-२७ असा सहज पाडाव केला. पूर्वार्धात २ लोण देत २६-०७ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या साईनाथ संघाने उत्तरार्धात सावध खेळ करीत सामना आपल्या नावे केला. सुशांत कदम, अक्षय सावंत यांच्या चढाई पकडीच्या झंझावाती खेळाने साईनाथ संघाने हा विजय प्राप्त केला. उत्तरार्धात वीर संताजीच्या ओमकार चव्हाणने आपला खेळ उंचावत सामन्यात रंगत आणली. पण संघाला विजयी करण्यात तो अपयशी ठरला.
दुसऱ्या सामन्यात महालक्ष्मी मंडळाने भवानीमाता प्रतिष्ठानचा प्रतिकार २८-२४ असा मोडून काढला. पूर्ण डाव चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात मध्यांतराला १०-०९ अशी नाममात्र आघाडी महालक्ष्मी संघाकडे होती. नंतर महालक्ष्मी संघाच्या सुशांत फकिराने एका चढाईत ४ गडी टिपत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. त्याला परशुराम पाटील याची उत्कृष्ट साथ लाभली. दर्शन तांबट, संतोष सावंत यांनी शेवटच्या क्षणापर्यंत निकराची लढत दिली.
वीर बजरंग सेवा मंडळाने हिंद केसरी मंडळाचा प्रतिकार २७-२१असा मोडून काढला. पहिल्या डावात ११-१० अशी आघाडी घेणाऱ्या विजय बजरंगने दोन्ही डावात १-१ लोण देत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हिंद केसरी संघाने पहिल्या डावात लोण देत सामन्यातील चुरस कायम ठेवली होती. पण दुसऱ्या डावात आपल्या खेळात सातत्य राखण्यात ते अपयशी ठरले.
समीर तोडणकर, अनिकेत रामाणे यांनी विजय बजरंग कडून, तर शुभम पेडणेकर, जयवंत खरात यांनी हिंद केसरी संघाकडून उत्कृष्ट खेळ केला. शताब्दी स्पोर्ट्स संघाने वीर नेताजी संघाचा ३३-१८ असा पाडाव करीत आगेकूच केली. विश्रांतीला १६-११ अशी आघाडी घेणाऱ्या शताब्दीने विश्रांतीनंतर आपला खेळ गतिमान करीत आपला विजय निश्र्चित केला. करण जैसवाल, साहिल कदम यांच्या चढाई पकडीच्या खेळाने हा विजय सोपा झाला. वीर नेताजीचा शिरीष पांगमने एकाकी लढत दिली.
या स्पर्धेला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जया शेट्टी, त्यांची पत्नी शिवछत्रपती पुरस्कार छाया शेट्टी (बांदोडकर), मुलगा शिवछत्रपती पुरस्कार्थी गौरव शेट्टी या परिवारांनी सदिच्छा भेट दिली.