
शिरपूर ः कर्मवीर क्रिकेट क्लबच्या राजवर्धन रंधे याची धुळे जिल्हा क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १६ वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशन संघाची निवड चाचणी नुकतीच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, कुंडाणे, धुळे येथे पार पडली. या निवड चाचणीसाठी जिल्ह्यातून सुमारे २०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. खेळाडूंची तज्ञ निवड समितीद्वारे कौशल्य चाचणी व सामने घेण्यात आले. या निवड चाचणीत उत्तम कामगिरी करणाऱ्या अंतिम १५ खेळाडूंचा संघ जाहीर झाला असून या अंतिम १५ खेळाडूंच्या संघात किसान विद्या प्रसारक संस्था संचलित केव्हीटीआर सीबीएसई स्कूल शिरपूरच्या इयत्ता दहावी शिकणाऱ्या राजवर्धन शशांक रंधे या खेळाडूची निवड झाली आहे.
उत्तम गुण व उत्कृष्ट क्रिकेट कौशल्य यामुळे राजवर्धन रंधे याची निवड झाली असून यापूर्वी त्याने १४ वर्षांखालील मुलांच्या जिल्हा क्रिकेट संघात देखील स्थान मिळविले होते. राजवर्धन रंधे हा संस्थेच्या कर्मवीर क्रिकेट क्लब येथे व्यावसायिक क्रिकेट प्रशिक्षणाचे धडे घेत असून तो अतिशय शिस्तप्रिय खेळाडू आहे.
या निवडीबद्दल केव्हीपीएस संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांच्या हस्ते त्याचा गुणगौरव करण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक निलेश चोपडे, व्यवस्थापक भैय्या माळी, समन्वयक सागर वाघ उपस्थित होते. संस्थेचे क्रिकेट प्रशिक्षक प्रा राकेश बोरसे यांचे त्याला प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभत आहे. कमी कालावधीत कर्मवीर क्रिकेट क्लबच्या खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबद्दल जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भुपेशभाई पटेल, राजवर्धन कदमबांडे, उपाध्यक्ष लहू पाटील, विक्रम राठोड, यशवर्धन कदमबांडे, सचिव प्रीतेश पटेल, मुख्य क्रिकेट प्रशिक्षक राजन चौक, निवड समिती सदस्य अरविंद किल्लेदार, सतीश मराठे, दबीर शेख तर किसान विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉ तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, संचालक राहुल रंधे, रोहित रंधे, शशांक रंधे आदींनी राजवर्धनचे कौतुक केले.