कंबाइंड बँकर्स, वन विभाग अंतिम फेरीत

  • By admin
  • April 25, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धा ः सय्यद तल्हा, कुणाल फलक सामनावीर

छत्रपती संभाजीनगर ः ३२व्या शहीद भगतसिंग करंडक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत वन विभाग संघाने जिल्हा वकील संघाला सहा विकेटने पराभूत करुन पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. महावितरण अ संघावर दणदणीत विजय साकारत कंबाइंड बँकर्स संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या लढतीत सय्यद तल्हा व कुणाल फलक हे भंडारी इलेक्ट्रिकल्स सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.

गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या कॉस्मो फिल्म प्रायोजित व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित शहीद भगतसिंग क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळवल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या झालेल्या सामन्यात वन विभाग संघाने जिल्हा वकील अ संघावर ६ गडी राखून दणदणीत विजय साकारला. कंबाइंड बँकर्स संघाने महावितरण अ संघावर सात गडी राखून विजय संपादन करुन अंतिम फेरी गाठली. वन विभाग संघाने बलाढ्य जिल्हा वकील संघाला नमवून पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे.

पहिला उपांत्य सामना जिल्हा वकील अ आणि वन विभाग या संघांदरम्यान खेळविण्यात आला. वन विभाग संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जिल्हा वकील अ संघातर्फे प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ९ बाद १२९ धावा केल्या. यामध्ये कर्णधार मोहित घाणेकर याने ३२ चेंडूत ५ चौकारांसह ३४ धावा, निरंजन चव्हाण याने १३ चेंडूत ३ चौकारांसह २० धावा तर ओम जाधव याने आठ चेंडूत १ षटकार व १ चौकारासह १३ धावांचे योगदान दिले. तर बाकीचे फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत.

वन विभाग संघातर्फे गोलंदाजी करताना कर्णधार आनंद गायके याने १५ धावांत ३ महत्त्वपूर्ण गडी बाद केले तर ज्ञानेश्वर मुंडे, दिनेश वाघ यांनी प्रत्येकी २ गडी व सय्यद तल्हा याने २३ धावात १ गडी बाद केला. तर दोन फलंदाज धावचित झाले.

प्रत्युत्तरात वन विभाग संघाने विजयी लक्ष केवळ १८ षटकात ४ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये यश यादव याने ३१ चेंडूत १ षटकार व ७ चौकारांसह ४७ धावा, सचिन धंगे याने २९ चेंडूत २ चौकारांसह ३२ धावा, सय्यद तल्हा याने १३ चेंडूत १ षटकार व १ चौकारासह १९ धावा तर धनंजय वायभसे याने २६ चेंडूत ३ चौकारांसह १५ धावांचे योगदान दिले. जिल्हा वकील अ संघातर्फे गोलंदाजी करताना हिंदुराव देशमुख याने १८ धावांत ३ गडी तर विकास नगरकर याने १५ धावात १ गडी बाद केला.

दुसरा सामना महावितरण अ आणि कम्बाइंड बँकर्स या संघांदरम्यान खेळविण्यात आला. महावितरण अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ बाद १२७ धावा केल्या. यामध्ये स्वप्निल चव्हाण याने सर्वाधिक ४५ चेंडूत ९ चौकारांसह ६० धावा, प्रवीण क्षीरसागर याने १० चेंडूत ३ चौकारांसह १६ धावा, महेश मुळेकर याने १६ चेंडूत १ षटकार व १ चौकारासह १६ धावा तर कर्णधार प्रदीप चव्हाण याने १२ चेंडूत १ चौकारासह ११ धावांचे योगदान दिले.

कंबाइंड बँकर्स संघातर्फे गोलंदाजी करताना कर्णधार शाम लहाने याने १९ धावात २ गडी, अभिषेक ठेंगे याने २८ धावात २ गडी तर हरमितसिंह रागी, सय्यद इनायत अली व इम्रान अली खान यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

प्रत्युत्तरात कंबाइंड बँकर्स संघाने विजयी लक्ष १८ षटकात ३ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये कुणाल फलक याने ४० चेंडूत ६ चौकारांसह ४७ धावा, इंद्रजीत उढाण याने ३३ चेंडूत १ षटकार व ६ चौकारांसह ४० धावा, निखिल मुरूमकर याने २१ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह २२ धावा तर सय्यद इनायत अली याने ११ चेंडूत २ चौकारांसह ११ धावांचे योगदान दिले. महावितरण अ संघातर्फे गोलंदाजी करताना शाहेद सिद्दिकी आणि पांडुरंग धांडे आणि प्रत्येकी १ गडी बाद केला तर एक फलंदाज धावचित झाला.

या सामन्यात पंचाची भूमिका महेश सावंत, विशाल चव्हाण, विष्णू बब्बीरवाल, सुनील बनसोडे, तर गुणलेखकाची भूमिका किरण भोळे यांनी पार पाडली, असे संयोजन समितीचे सदस्य व शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर मानकापे यांनी सांगितले.

रविवारी अंतिम सामना

वन विभाग आणि कंबाइंड बँकर्स (सकाळी ७.१५ वाजता)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *