
बंगळुरू ः जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना माजी भारतीय फलंदाज सुनील गावसकर यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांच्या भ्याड कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि त्यांना अनेक प्रश्न विचारले. मंगळवारी झालेल्या या हल्ल्यात दोन परदेशी नागरिकांसह २६ जणांचा मृत्यू झाला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यापूर्वी, माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी जोर देऊन सांगितले की हिंसाचारामुळे कोणताही सकारात्मक परिणाम होत नाही. देशाच्या भल्यासाठी शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.
गावसकर दहशतवाद्यांवर संतापले
सुनील गावसकर स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर बोलताना म्हणाले की, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे अशा सर्व कुटुंबांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. याचा परिणाम आपल्या सर्व भारतीयांवर झाला आहे. मला फक्त सर्व गुन्हेगारांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांना – दहशतवादी, त्यांचे मालक – एक प्रश्न विचारायचा आहे की या सर्व लढाईतून काय साध्य झाले आहे?
गावसकर पुढे म्हणाले की, गेल्या ७८ वर्षात एक मिलिमीटरही जमीन हस्तांतरित झालेली नाही, बरोबर? त्यामुळे पुढील ७८,००० वर्षे आणि त्यानंतरच्या सर्व वर्षांमध्ये काहीही बदलणार नाही. मग आपण शांततेत का राहत नाही आणि आपला देश मजबूत का करत नाही? हे माझे आवाहन आहे.