
नवी दिल्ली ः भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी शुक्रवारी सांगितले की, शनिवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामुळे संघाला स्वतःचे मूल्यांकन करण्यास मदत होईल आणि भविष्य लक्षात घेऊन वेगवेगळ्या संयोजनांचा प्रयत्न केला जाईल. सलीमा टेटे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २६ आणि २७ एप्रिल रोजी ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध आणि १, ३ आणि ४ मे रोजी ऑस्ट्रेलियन वरिष्ठ संघाविरुद्ध खेळेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १६ सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने दहा सामने जिंकले आहेत तर तीन अनिर्णित राहिले आहेत. भारतीय महिला संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकला नाही त्यानंतर जॅनेके शोपमन यांच्या जागी प्रशिक्षकपदी आलेले हरेंद्र म्हणाले, “संघाने बेंगळुरूमध्ये कठोर सराव केला आहे आणि हा दौरा आपण कुठे उभे आहोत हे सांगेल.”
हरेंद्र म्हणाले की, ‘आमचे लक्ष खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी देणे, संघाची खोली वाढवणे आणि नवीन संयोजने वापरून पाहणे यावर आहे. ऑस्ट्रेलिया अ संघ आणि त्यांच्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघाविरुद्ध खेळल्याने आम्हाला खूप काही शिकायला मिळेल आणि भविष्यातील स्पर्धांसाठी आम्ही स्वतःला तयार करू शकू. भारताने अलीकडेच प्रो लीगमध्ये दोन विजय मिळवले आणि नेदरलँड्स संघाला पेनाल्टी शूटआउट मध्ये हरवले आहे.