
पुणे ः यशाचे शिखर गाठण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करण्याची व अहोरात्र कष्ट करण्याची आवश्यकता असते असे मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार विजेते ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील करिअरच्या संधी, खेळाडूंची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, क्रीडा शिष्यवृत्त्या, खेळाडूंचे आहार, क्रीडा माध्यमातून नेतृत्व, वेळेचे व्यवस्थापन इत्यादी बाबत माहिती होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ टिळक रोड संस्थेतर्फे मिलेनियम स्कूल कर्वेनगर येथे दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेचा प्रारंभ अभिजीत कुंटे यांच्या हस्ते झाला. यावेळी रोटरी क्लब ऑफ टिळक रोड संस्थेचे अध्यक्ष पराग गाडगीळ, सचिव देवदत्त हंबर्डीकर, युवा कार्यक्रमाच्या संचालिका स्वाती पाटील, मिलेनियम नॅशनल स्कूल संस्थेचे संचालक अन्वित फाटक आदी उपस्थित होते.
पराभव ही यशाची पहिली पायरी असते, पराभवाने खचून न जाता त्यापासून बोध घेत यशाचे शिखर कसे गाठता येईल याचा विचार केला पाहिजे असे सांगून अभिजीत कुंटे म्हणाले की, प्रत्येक खेळामध्ये प्रशिक्षक व मेंटॉर यांच्याबरोबरच फिजिओ, मानसिक तज्ञ, क्रीडा वैद्यकीय तज्ञ, आहार तज्ञ इत्यादी सपोर्ट स्टाफची आवश्यकता असते. तसेच सर्वोत्तम क्रीडा सुविधा व साहित्य याचीही गरज असते. कनिष्ठ गटातून वरिष्ठ गटात गेल्यानंतर लगेच यश मिळवता येत नाही त्यासाठी काही महिन्यांचा वेळ द्यावा लागतो. या कालावधीमध्ये चिकाटी व संयम याची आवश्यकता असते. नेहमीच आपल्यापेक्षा अनुभवाने वरचढ असलेल्या खेळाडूवर मात करण्याचे ध्येय ठेवले की आपोआप आपली कामगिरी त्याच्या इतकी होऊ शकते.”
कुंटे यांनी पुढे सांगितले, “दुर्दैवाने आजकाल टेलिव्हिजन व मोबाईल यामुळे मुलांचे मैदानाचे आकर्षण कमी झाले आहे. आपल्या मुलांनी खेळामध्ये करिअर करावे यासाठी पालकांनी या मुलांना या प्रलोभनांपासून दूर ठेवले पाहिजे. मुलांनी मोठमोठ्या खेळाडूंवर लिहिलेले पुस्तके त्यांच्यावरील चित्रपट पाहण्याची आवश्यकता आहे.
क्रीडा क्षेत्रातील शिष्यवृत्ती व करिअरच्या संधी याविषयी इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी संस्थापक संचालक डॉक्टर विपुल लुनावत यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खेळाडू, प्रशिक्षक, फिजिओ, मानसिक तज्ञ, क्रीडा वैद्यकीय तज्ञ, आहार तज्ञ, क्रीडा व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात करिअरच्या कशा संधी आहेत हे विशद केले. सन २०३६ मध्ये भारत ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचे प्रयत्न करीत आहे. ही स्पर्धा आयोजित करण्याची भारताला संधी मिळाली तर खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये क्रीडा क्षेत्रात मोठी क्रांती होईल असेही त्यांनी सांगितले.