
भगतसिंग करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेचा रविवारी समारोप
छत्रपती संभाजीनगर ः गरवारे क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (२७ एप्रिल) कम्बाइंड बँकर्स आणि वन विभाग यांच्यात खेळवला जाणार आहे.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू प्रशांत वैद्य, इंडियन फॉरेस्ट सर्विसेसचे अधिकारी धनंजय वायभसे, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय केणेकर, कॉस्मो फिल्म्सचे उपाध्यक्ष संजय चिंचोलीकर, शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण साक्रूडकर, शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर मानकापे, शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सचिव गंगाधर शेवाळे या सर्व मान्यवरांच्या उपस्थित पार पडणार आहे.

३२व्या शहीद भगतसिंग औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत वन विभाग संघाने गतवर्षीचा उपविजेता जिल्हा वकील संघाला उपांत्य फेरीत नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला तर कम्बाइंड बँकर्स संघाने महावितरण संघास पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

या स्पर्धेत पहिल्यांदा अंतिम फेरी गाठणाऱया वन विभाग संघातर्फे यश यादव याने ५ सामन्यात २४२ धावांचे योगदान दिले. तसेच कर्णधार आनंद गायके व सय्यद तल्हा यांनी अष्टपैलू खेळी करत आपल्या संघासाठी सिंहाचा वाटा उचलला. तसेच कम्बाइंड बँकर्स संघातर्फे मिलिंद पाटील याने ३ सामन्यात १४४ धावांचे योगदान दिले. तर सय्यद इनायत अली याने ५ सामन्यात १० महत्त्वपूर्ण गडी बाद केले. तसेच कुणाल फलक याने अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभावत आपल्या संघासाठी एक उच्च प्रतीचा ठसा उमटवला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला जास्तीत जास्त क्रिकेट रसिकांनी उपस्थित राहून स्पर्धेचा अंतिम सामन्याचा आनंद लुटावा व सहकार्य करावे असे आवाहन शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष व संयोजन समितीचे सदस्य दामोदर मानकापे तसेच संयोजन समितीचे सदस्य गंगाधर शेवाळे, राजेश सिद्धेश्वर, अनंत नेरळकर, उदय बक्षी, संदीप भंडारी, सागर वैद्य, राकेश सूर्यवंशी, प्रशांत याकुंडी, जितेंद्र बरंजाळेकर, योगेश मानकापे, प्रथमेश वैद्य यांनी केले आहे.