
रेल्वेची स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धा ः ओंकार भांबुरे सामनावीर
सोलापूर ः मध्य रेल्वे इन्स्टिट्यूटच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट
स्पर्धेत अ गटाच्या सामन्यात साऊथ सोलापूर आपटे ग्रुप अ संघाने कंपली प्रकाश क्रिकेट अकादमीवर ९८ धावांनी शानदार विजय मिळविला.
येथील रेल्वे मैदानावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत साऊथ सोलापूर आपटे ग्रुपने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २११ धावा केल्या. केपीसीसी संघास २१२ धावांचे विजयी लक्ष्य पेलवले नाही. साऊथ सोलापूर संघाने त्यांचा डाव ११३ धावांत गुंडाळला. चार बळी टिपणारा ओंकार भांबुरे सामन्याचा मानकरी ठरला. त्यास अतुल बांडीवाडीकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. प्रत्येक सामनावीर पुरस्कार सुदेश व सुनील मालप यांच्याकडून देण्यात येत आहेत. पंच म्हणून चंदू मंजेली व नितीन गायकवाड तर गुणलेखक म्हणून गेनबा सुरवसे यांनी काम पाहिले.
संक्षिप्त धावफलक
साऊथ सोलापूर आपटे ग्रुप : ३६ षटकांत सर्वबाद २११ (निरंजन ६६, मंदार काळे ६५, आकाश राठोड १९ धावा, नारायण डोके ४ बळी, यश मंगरुळे २ बळी, सन्नी पौळ, आशुतोष माने, आदित्य तमनुर प्रत्येकी १ बळी) विजयी विरुद्ध केपीसीसी : ३३ षटकांत सर्वबाद ११३ (श्रेयस सुरवसे ५०, आदित्य बंडगर १९, अथर्व तोतड १२ धावा, ओंकार भांबुरे ४ बळी, आदर्श मनुरे २ बळी, श्रेयस दुधगी, स्वप्नील हांचाटे, चेतक गोरे प्रत्येकी १ बळी).