
युनिव्हर्सल वन-डे लीग क्रिकेट ः शौर्य पाटील सामनावीर

छत्रपती संभाजीनगर ः युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर १६ एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अपेक्स क्रिकेट अकादमी संघाने अटीतटीच्या लढतीत जॉन्टी क्रिकेट अकादमी संघावर एक विकेट राखून रोमांचक विजय नोंदवला. या सामन्यात शौर्य पाटील याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक राहुल पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन युनिव्हर्सल क्रिकेट ग्राउंडवर केले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने युवा खेळाडूंना एकदिवसीय सामना खेळण्याचा चांगला अनुभव प्राप्त होत आहे. त्यामुळे ही स्पर्धा युवा खेळाडूंना लाभदायक ठरत असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.
या सामन्यात जॉन्टी क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॉन्टी अकादमीच्या फलंदाजांनी १९.३ षटकात सर्वबाद १०० असे माफक लक्ष्य उभे केले. प्रत्युत्तरात अपेक्स क्रिकेट अकादमी संघाने २४.१ षटकात नऊ बाद १०१ धावा फटकावत एक विकेट राखून रोमांचक विजय नोंदवला.

कमी धावसंख्येच्या या सामन्यात शौर्य पाटील याने शानदार ३४ धावांची खेळी साकारली. त्याने ६६ चेंडूत ३४ धावा काढताना पाच चौकार मारले. एकलव्य मोंढेकर याने १७ चेंडूत २० धावांची जलद खेळी केली. त्याने चार चौकार मारले. सुमित पवार यने १८ चेंडूत १६ धावा फटकावल्या. त्याने तीन चौकार मारले. गोलंदाजीत एकवल्य मोंढेकर याने २७ धावांत चार विकेट घेऊन सामना गाजवला. एकलव्य याने फलंदाजी व गोलंदाजीत अष्टपैलू कामगिरी बजावत लक्ष वेधून घेतले. संस्कार याने १८ धावांत चार गडी बाद करुन आपला ठसा उमटवला. सिद्धार्थ जाधव याने १४ धावांत तीन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
जॉन्टी क्रिकेट अकादमी ः १९.३ षटकात सर्वबाद १०० (आदर्शराजे घोलप १२, एकलव्य मोंढेकर २०, यश डोईफोडे १२, सुमित पवार १६, अरुण जांगिड ६, आशिष डुंगडुंग ५, इतर १८, संस्कार ४-१८, शौर्य पाटील ३-२९, सिद्धार्थ जाधव ३-१४) पराभूत विरुद्ध अपेक्स क्रिकेट अकादमी ः २४.१ षटकात नऊ बाद १०१ (शौर्य पाटील ३४, विनित अक्कर ४, सिद्धार्थ जाधव ४, कार्तिक जयस्वाल ५, प्रथमेश भुरे नाबाद ९, संस्कार नाबाद १, इतर ३९, एकलव्य मोंढेकर ४-२७, अरुण जांगिड २-१७, सुमित पवार १-१३, नितीन बोराडे १-६, श्रावणी खडके १-८). सामनावीर ः शौर्य पाटील.