
नवमित्र क्रीडा मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कबड्डी स्पर्धा – निकेश महाळुंगे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू
मुंबई ः शताब्दी स्पोर्ट्स यांनी वरळीच्या नवमित्र क्रीडा मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या द्वितीय श्रेणी (ब) गट कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
शताब्दीचा निकेश महाळुंगे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला चषक, प्रवासी बॅग व आयर्न हाऊस प्रीमियम वेलनेसचे एक वर्षाचे सभासत्व मोफत देऊन गौरविण्यात आले. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वरळी येथील वरळी स्पोर्ट्स क्लबच्या यशवंत साळवी मॅटच्या क्रीडांगणावर दीपक वेर्लेकर चषकाकरिता झालेल्या अंतिम सामन्यात धारावीच्या शताब्दी स्पोर्ट्स संघाने पूर्वार्धातील १४-१५ अशा एका गुणाच्या पिछाडीवरून प्रभादेवीच्या श्री संस्कृती प्रतिष्ठानचा प्रतिकार २९-२४ असा मोडून काढत दीपक वेर्लेकर चषक व रोख सात हजार रुपये आपल्या नावे केले. उपविजेत्या संस्कृतीला चषक व रोख पाच हजार रुपयांवर समाधान मानावे लागले.
आक्रमक सुरुवात करीत शताब्दीने पहिला लोण देत आघाडी घेतली. पण ती फार काळ टिकली नाही. संस्कृती संघाने लोणची परतफेड करत आघाडी आपल्याकडे घेतली. विश्रांतीला संस्कृतीकडे एका गुणाची आघाडी होती. उत्तरार्धात मात्र या धक्क्यातून सावरत शताब्दीने दुसरा लोण देत पुन्हा आघाडी घेतली. शेवटी ती आघाडी टिकवत ५ गुणांनी जेतेपदावर आपला हक्क प्रस्थापित केला.
निकेश महाळुंगे याच्या संयमी चढाया त्याला मोक्याच्या क्षणी करण जैस्वाल यांनी धाडसी पकडी करीत दिलेली मोलाची साथ यामुळे हे शक्य झाले. संस्कृतीच्या रोहित यादव, रोशन राय यांचा पूर्वार्धातील खेळ उत्तरार्धात बहरला नाही. या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात शताब्दीने ओम् श्री साईनाथ सेवा ट्रस्टचा ३४-२२ असा, तर श्री संस्कृतीने अमर क्रीडा मंडळाचा ३०-२७ असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. उपांत्य पराभूत दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख तीन हजार रुपये प्रदान करण्यात आले. श्री संस्कृतीचा रोहित यादव आणि शताब्दीचा करण जैस्वाल हे या स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई आणि पकडीचे खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी चषक व प्रवासी बॅग देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विलास जाधव, विलास वेर्लेकर, हरीश कारकी, राजन गवाणकर, संतोष गवाणकर, विक्रम बालन आणि जयराम मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.