
ठाणे ः श्री मावळी मंडळ संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त व १००व्या शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित ७२व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सन्मित्र क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, विजय स्पोर्ट्स काल्हेर ठाणे, चेंबूर क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, शिवशंकर क्रीडा मंडळ ठाणे, आत्माराम क्रीडा मंडळ डोंबिवली ठाणे, जय बजरंग स्पोर्ट्स क्लब ठाणे, श्री शिवाजी उदय मंडळ पुणे, बंड्या मारुती सेवा मंडळ मुंबई शहर, साई स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगर, श्री समर्थ क्रीडा मंडळ कालावार ठाणे या संघांनी विजयी आगेकूच कायम ठेवली.

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती पुरस्कार प्राप्त वीणा खवळे, गौरव शेट्टी, निलेश साळुंखे व पत्रकार जयेंद्र लोंढे यांचा सत्कार करण्यात आला.

पुरुषांच्या पहिल्या सामन्यात मुंबई शहरच्या बंड्या मारुती सेवा मंडळ संघाने ठाण्याच्या जय हनुमान काल्हेर संघाचा २२-२१ असा १ गुणांनी विजय मिळविला. सदर सामना सुरुवातीपासून अतिशय अटीतटीचा चालू होता. दोन्ही संघानी सुरुवातीला सावध पवित्रा घेतला होता. मध्यन्तरापर्यंत जय हनुमान संघाकडे ९-७ अशी फक्त २ गुणांची आघाडी होती. मध्यंतरानंतर मात्र शुभम चौगुले याने खोलवर चढाया करीत आपल्या संघासाठी चार गुणांची कमाई केली. शेवटचा मिनिट असताना शुभमने खोलवर चढाई करीत आपल्या संघाला २ गुण मिळवून देत सामना १ गुणांनी जिंकला.
पुरुष गटातील दुसऱ्या सामन्यात मुंबई उपनगरच्या सन्मित्र क्रीडा मंडळाने मुंबई शहरच्या अशोक मंडळाचा ४२-३९ असा ३ गुणांनी पराभव केला. मध्यंतराला अशोक मंडळाकडे १९-१५ असा ३ गुणांची आघाडी होती. मध्यंतरानंतर सन्मित्र क्रीडा मंडळाचा चढाईपटू सुरज सुतार याने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत अतिशय रोमहर्षक खेळ करीत आपल्या संघाची गुणसंख्या भराभर वाढवली. त्याला लक्ष्मण सावंत याने पक्कडीत तेवढीच साथ दिली व सामना शेवटच्या पाच मिनिटात आपल्या संघाकडे झुकविला. पराभूत संघाकडून सोहम पुंडे व अंकित जाधव यांनी छान खेळ केला.
महिला गटातील अतिशय अटीतटीच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या स्नेहविकास क्रीडा मंडळाने ठाण्याच्या ज्ञानशक्ती युवा संस्था संघावर ३८-३५ असा ३ गुणांनी निसटता विजय मिळविला. सदर सामन्यात मध्यंतराला स्नेहविकास क्रीडा मंडळाच्या प्राची तावडे हिच्या चतुरस्त्र खेळाने २९-१३ अशी १६ गुणांची आघाडी घेतली. मध्यंतरानंतर मात्र ज्ञानशक्ती युवा संस्था संघाच्या निधी राजोळेने खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या भराभर वाढविली. तिला पक्कडीमध्ये यतिक्षा बावडे हिने सुंदर साथ दिली. सामना संपायला शेवटची पाच मिनीटे असताना स्नेहविकास क्रीडा मंडळाकडे फक्त ४ गुणांची आघाडी होती. स्नेहविकास क्रीडा मंडळाने आपला सर्व अनुभव पणाला लावून सामन्यावरची पक्कड ढिली होऊ न देता सामना आपल्या बाजूने झुकवला.

स्पर्धेचे शानदार उद्घाटन
या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी विशेष अतिथी म्हणून गोपाळ लांडगे (कल्याण जिल्हाप्रमुख), सुधीर कोकाटे (माजी नगरसेवक), हेमंत पवार (ठाणे विधानसभा शहरप्रमुख), सुहास देसाई (अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) हे उपस्थित होते. त्यांच्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, उपाध्यक्ष सुनील करंजकर, चिटणीस रमण गोरे, उप चिटणीस संतोष सुर्वे, सहाय्यक चिटणीस चिंतामणी पाटील, खजिनदार रिक्सन फर्नांडीस, विश्वस्त प्रभाकर सुर्वे, विश्वस्त कृष्णा डोंगरे, विश्वस्त पॅट्रिक फर्नांडीस, विशवस्त केशव मुकणे हे उपस्थित होते. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी छत्रपती पुरस्कार प्राप्त सुनील जाधव, मेघाली कोरगांवकर – म्हसकर, रिबीका गवारे, ज्येष्ठ पत्रकार सुहास जोशी व सुधीर खानोलकर ज्येष्ठ कबड्डी संघटक यांचाचा विशेष सत्कार करण्यात आला.
दिवसाचे उत्कृष्ट खेळाडू
- महिला गट : प्राची तावडे (स्नेहविकास क्रीडा मंडळ – मुंबई उपनगर)
- पुरुष गट : निहार पाटील (विजय स्पोर्ट्स काल्हेर – ठाणे)