
सोलापूर ः छत्रपती संभाजीनगरच्या साई सेवा क्रीडा मंडळासह प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स क्लब पुणे, मिडलाईन स्पोर्ट्स क्लब मुंबई व जय हिंद क्रीडा मंडळ श्रीरामपूर या संघाने राज्य निमंत्रित कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
क्रीडा भारती, छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ व भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा शिंदे चौक येथील शिवस्मारक मैदानावर सुरू आहे. रविवारी सकाळी उपांत्यपूर्व फेरीतील साई सेवा क्रीडा मंडळ छत्रपती संभाजीनगर विरुद्ध स्वराज्य क्रीडा मंडळ भूम हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. मध्यंतरापर्यंत १३-१३ आणि निर्धारित वेळेत २०-२० अशा बरोबरीनंतर प्रत्येकी पाच चढाईमध्ये छत्रपती संभाजीनगरने ६-५ अशी एका गुणाने बाजी मारली. प्रत्येकी पाच चढाईमध्ये छत्रपती संभाजीनगरने प्रत्येक चढाईत गुण वसूल केले. भूम संघास मात्र, दोन बोनस गुण व व तीन गुण असे पाच गुण मिळाले. संभाजीनगरकडून गणेश चव्हाण, आदेश, समाधान, राहुल व नकुल यांनी गुण नोंदवले. भूमकडून फैज मुगल,निलेश वरे, रोहन कैकान, सुरक्षा मुळे व अनिकेत भारती यांचे प्रयत्न अपुरे पडले.
अन्य उपांत्यपूर्व सामन्यात पुण्याच्या प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स क्लबने सोलापूरच्या श्रीराम स्पोर्ट्स क्लबवर ५५-२७ असा ३२ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. मिडलाईन स्पोर्ट्स क्लब मुंबईने पुण्याच्या नवजीवन कबड्डी संघावर ४३-१८ शानदार विजय मिळविला. जय हिंद क्रीडा मंडळ श्रीरामपूरने शिवम क्रीडा मंडळ पैठणला ४०-२३ असे नमविले.
सोलापूरच्या संघांकडून निराशा
या स्पर्धेत राज्यातील १४ व सोलापुरातील सहा संघांना प्रवेश दिला होता. त्यापैकी विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब, स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, श्रीराम स्पोर्ट्स क्लब व श्रीकृष्ण स्पोर्ट्स क्लब हे संघ सहभागी होते. परंतु शंभुराजे कुमठे व अंजुमन क्रीडा मंडळ हे संघ अनुपस्थित होते. त्यापैकी श्रीराम स्पोर्ट्स क्लबने बाद फेरीत प्रवेश केला होता.