कम्बाइंड बँकर्स संघाने भगतसिंग करंडक जिंकला

  • By admin
  • April 27, 2025
  • 0
  • 25 Views
Spread the love
  • अंतिम सामन्यात वन विभाग संघावर १६ धावांनी विजय
  • मिलिंद पाटील, इनायत अली, सोमनाथ पाचलिंगे, संदीप शिंदेची दमदार कामगिरी

छत्रपती संभाजीनगर ः ३२व्या शहीद भगतसिंग करंडक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत कम्बाइंड बँकर्स संघाने भगतसिंग करंडक पटकावला. कम्बाइंड बँकर्स संघाने पहिल्यांदा अंतिम फेरी गाठणाऱया वन विभाग संघाचा चुरशीच्या लढतीत १६ धावांनी पराभव करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यात भंडारी इलेक्ट्रिकल्स सामनावीर पुरस्कार सय्यद इनायत अली याने संपादन केला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर या स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. कॉस्मो फिल्म्स प्रायोजित व शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित ३२व्या शहीद भगतसिंह क्रिकेट सामन्यांमध्ये रविवारी अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात कम्बाइंड बँकर्स संघाने वन विभाग संघावर १६ धावांनी विजय संपादन केला.

अंतिम सामना कम्बाइंड बँकर्स व वन विभाग या संघांदरम्यान खेळविण्यात आला. वन विभाग संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कम्बाइंड बँकर्स संघातर्फे प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ बाद १४० धावा केल्या. यामध्ये मिलिंद पाटील याने ४९ चेंडूत १ षटकार व ४ चौकारांसह ४७ धावांची धमाकेदार खेळी केली. कुणाल फलक याने २६ चेंडूत ४ चौकारांसह २८ धावा, इंद्रजीत उढाण याने २२ चेंडूत ४ चौकारांसह २७ धावा तर हरमितसिंग रागी याने ११ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह २३ धावांचे योगदान दिले.

वन विभाग संघातर्फे गोलंदाजी करताना मोहम्मद शमीम, यश यादव, कर्णधार आनंद गायके यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला तर एक फलंदाज धावचित झाला.

प्रत्युत्तरात वन विभाग संघ २० षटकात ७ बाद १२४ धावाच करू शकला. यामध्ये सोमनाथ पाचलिंगे याने ३७ चेंडूत २ चौकारांसह ३२ धावा, कर्णधार आनंद गायके याने २१ चेंडूत २ षटकार व २ चौकारांसह २७ धावा, संदीप शिंदे याने ३० चेंडूत ३ चौकारांसह २७ धावा तर मोहम्मद शमीम याने ६ चेंडूत २ चौकारांसह १४ धावांचे योगदान दिले.

कंबाइंड बँकर्स संघातर्फे गोलंदाजी करताना सय्यद इनायत अली याने अप्रतिम गोलंदाजी करताना केवळ १३ धावांत ३ महत्वपूर्ण गडी बाद केले. तर हरमितसिंग रागी याने १८ धावांत २ गडी, कर्णधार शाम लहाने व कुणाल फलक यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सय्यद इनायत अली याने तीन बळी घेऊन सामन्याला कलाटणी दिली.

तत्पूर्वी, अंतिम सामन्याची सुरुवात कास्मो फिल्म्सचे उपाध्यक्ष संजय चिंचोलीकर, इंडियन फॉरेस्ट सर्विसचे अधिकारी धनंजय वायभसे तसेच शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण साक्रूडकर यांच्या हस्ते झाली. अंतिम सामन्यात पंचांची भूमिका रायफ्फुदिन नेहरी व कमलेश यादव तर गुण लेखनाची भूमिका किरण भोळे व प्रथमेश वैद्य यांनी पाडली. सामन्याचे धावते समालोचन अमृत बिऱहाडे व शाम देशमुख यांनी केले.

पारितोषिक वितरण सोहळा
अंतिम सामन्याच्या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू प्रशांत वैद्य, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय केनेकर,कॉस्मो फिल्म्सचे उपाध्यक्ष संजय चिंचोलीकर, शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण साक्रूडकर, शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष श्री दामोदर मानकापे, शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सचिव गंगाधर शेवाळे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत बिऱहाडे यांनी केले. उदय बक्षी यांनी आभार मानले.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राजेश सिद्धेश्वर, गंगाधर शेवाळे, अनंत नेरळकर, राकेश सूर्यवंशी, उदय बक्षी, सागर वैद्य, संदीप भंडारी, प्रशांत याकुंडी, योगेश मानकापे, जितेंद्र बरंजाळेकर, प्रथमेश वैद्य यांनी अथक परिश्रम घेतले.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू

फलंदाज ः यश यादव (२४२ धावा, वन विभाग)
गोलंदाज ः सय्यद इनायत अली (१३ विकेट, कम्बाइंड बँकर्स)
मालिकावीर ः यश यादव (२४२ धावा व ७ विकेट)
सामनावीर ः सय्यद इनायत अली (५ धावा व ३ बळी)
उत्कृष्ट फ्लेयर प्ले टीम ः रुचा इंजिनिअरिंग टीम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *