
श्रीलंका संघावर नऊ विकेटने मात, प्रतिका रावलचे आक्रमक नाबाद अर्धशतक
कोलंबो ः तिरंगी मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने यजमान श्रीलंका महिला संघावर नऊ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता.
प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी यजमान श्रीलंका संघाला ३८.१ षटकात १४७ धावांवर सर्वबाद करुन संघाला सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले.
श्रीलंका संघाच्या विकेट ठराविक अंतराने पडत होत्या. हसिनी परेरा हिने सर्वाधिक ३० धावांचे योगदान दिले. कविशा दिलहारी हिने तीन चौकारांसह २५ तर अनुष्का संजीवनी हिने तीन चौकारांसह २२ धावा फटकावल्या. कर्णधार चामरी अथापथ्थु (७), हर्षिता मडावी (१४), हंसिमा करुणारत्ने (४) या आघाडीच्या फलंदाजांनी निराशाजनक फलंदाजी केली. तळाच्या अचिनी कुलसुरिया (१७), नीलाक्षी डी सिल्वा (१०) यांनी डावाला आकार दिला. श्रीलंकेचा डाव ३८.१ षटकात १४७ धावांत संपुष्टात आला.
भारतीय संघाकडून स्नेह राणा ही सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरली. स्नेह राणा हिने ३१ धावांत तीन विकेट घेतल्या. चरणी हिने २६ धावांत दोन तर दीप्ती शर्मा हिने २२ धावांत दोन गडी बाद केले. अरुंधती रेड्डी हिने २६ धावांत एक बळी मिळवला.
भारतीय महिला संघासमोर विजयासाठी १४८ धावांचे आव्हान होते. भारतीय संघाने धमाकेदार फलंदाजी करत २९.४ षटकात एक बाद १४९ धावा फटकावत सामना नऊ विकेट राखून जिंकला.
प्रतिका रावल व स्मृती मानधना या सलामी जोडीने डावाची सुरुवात आक्रमकपणे केली. या जोडीने ९.५ षटकात ५४ धावांची भागीदारी केली. स्मृती मानधना ४३ धावांवर बाद झाली. तिने ४६ चेंडूंचा सामना करत सहा चौकार मारले. त्यानंतर प्रतिका रावल व हरलीन देओल या जोडीने दुसऱया विकेटसाठी नाबाद ९५ धावांची भागीदारी करुन संघाच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले. प्रतिका रावल हिने शानदार अर्धशतक ठोकले. प्रतिकाने ६२ चेंडूत नाबाद ५० धावा फटकावल्या. तिने सात चौकार मारले. हरलीन देओल हिने ७१ चेंडूंत नाबाद ४८ धावा काढल्या. तिने चार चौकार मारले. २९.४ षटकात एक बाद १४९ धावा फटकावत भारताने नऊ विकेटने सामना जिंकला. प्रतिका रावल ही सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.