मुंबई इंडियन्स संघाचा सलग पाचवा विजय

  • By admin
  • April 27, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीसमोर लखनौ संघाची शरणागती

मुंबई ः वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (४-२२) घातक स्पेलसमोर लखनौ सुपर जायंट्स संघाचा डाव गडगडला. मुंबई इंडियन्स संघाने सलग पाचवा विजय नोंदवताना लखनौचा ५४ धावांनी पराभव केला.

लखनौ सुपर जायंट्स संघासमोर विजयासाठी २१६ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. एडेन मार्करम (९) लवकर बाद झाला. त्यानंतर मिचेल मार्श व निकोलस पूरन या जोडीने ४२ धावांची भागीदारी केली. विल जॅक्स याने निकोलस पूरन याची आक्रमक खेळी २७ धावांवर संपुष्टात आणत संघाला मोठे यश मिळवून दिले. पूरन याने १५ चेंडूत एक चौकार व तीन टोलेजंग षटकार मारले. विल जॅक्स याने खराब फॉर्ममध्ये असलेला कर्णधार ऋषभ पंत याला अवघ्या ४ धावांवर बाद करुन लखनौला मोठा धक्का दिला. पंत याने केवळ दोन चेंडूंचा सामना केला व एक चौकार मारला. मिचेल मार्श याने २४ चेंडूत ३४ धावा फटकावल्या. त्याने तीन चौकार व दोन षटकार मारले. बोल्ट याने मार्शला बाद करुन लखनौला चौथा धक्का दिला.

आयुष बदोनी व डेव्हिड मिलर यांनी थोडा प्रतिकार केला. बदोनी याने २२ चेंडूंत ३५ धावा काढल्या. त्याने दोन चौकार व दोन षटकार मारले. डेव्हिड मिलर याने तीन चौकारांसह १६ चेंडूत २४ धावांचे योगदान दिले. बुमराह याने मिलरसर अब्दुल समद (२), आवेश खान (०) यांना स्वस्तात बाद करुन लखनौचा पराभव निश्चित केला. रवी बिश्नोई १३ धावांचे योगदान देताना बुमराहला एक षटकार मारत आनंद व्यक्त केला. लखनौचा डाव २० षटकात १६१ धावांवर संपुष्टात आला.

मुंबईच्या विजयात जसप्रीत बुमराह याने मोलाचा वाटा उचलला. बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीने २२ धावांत चार विकेट घेऊन लखनौची दाणादाण उडवून दिली. बोल्ट (२-२०), जॅक्स (२-१८) यांनी प्रत्येकी दोन गडी टिपले.

मुंबईची बहारदार फलंदाजी

लखनौ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने धमाकेदार फलंदाजी करत २० षटकात सात बाद २१५ अशी भक्कम धावसंख्या उभारली.

रोहित शर्मा व रिकेलटन या सलामी जोडीने डावाची सुरुवात आक्रमक केली. रोहित शर्मा याने वेगवान गोलंदाज मयंक यादव याला दोन टोलेजंग षटकार ठोकत आपल्या डावाची दणक्यात सुरुवात केली. परंतु, मयंक यादव याने रोहितला त्याच षटकात बाद करुन मुंबईला पहिला धक्का दिला. रोहितने ५ चेंडूत दोन षटकारांसह १२ धावा फटकावल्या. रोहित बाद झाल्यानंतर रिकेलटन व विल जॅक्स या जोडीने अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. रिकेलटन ३२ चेंडूत ५८ धावांची बहारदार खेळी करुन बाद झाला. त्याने चार टोलेजंग षटकार व सहा चौकार मारले. विल जॅक्स २१ चेंडूत २९ धावांचे योगदान देऊन तंबूत परतला. त्याने एक षटकार व तीन चौकार मारले.

सुर्यकुमार यादव याने धमाकेदार फलंदाजी केली. सूर्यकुमार यादवने २८ चेंडूत ५४ धावा फटकावल्या. या आक्रमक खेळीत त्याने चार चौकार व चार षटकार ठोकत मैदान गाजवले. तिलक वर्मा (६) व हार्दिक पंड्या (५) हे आक्रमक फलंदाज स्वस्तात बाद झाले. नमन धीर याने ११ चेंडूत नाबाद २५ धावा फटकावल्या. त्याने दोन चौकार व दोन षटकार मारले. कॉर्बिन बॉश याने १० चेंडूत दोन चौकार व एक षटकार ठोकत २० धावा काढल्या.

लखनौ संघाकडून मयंक यादव (२-४०), आवेश खान (२-४२) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रिन्स यादव (१-४४), दिग्वेश राठी (१-४८), रवी बिश्नोई (१-४१) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *