
सेंट पॅट्रिक स्पोर्ट्स अकादमीतर्फे आयोजन
छत्रपती संभाजीनगर ः सेंट पॅट्रिक स्पोर्ट्स अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सेवन ए साइड नॉकआऊट फुटबॉल स्पर्धेत तल्हा फुटबॉल अकादमी व नोबल फुटबॉल अकादमी या संघांनी शानदार खेळ करत विजेतेपद पटकावले.
सेंट पॅट्रिक स्पोर्ट्स अकादमीने अलीकडेच सेवन ए साईड नॉकआउट फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा १४ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील वयोगटात घेण्यात आली. या स्पर्धेत युवा फुटबॉलपटूंनी उदयोन्मुख प्रतिभेचे प्रदर्शन केले. ही स्पर्धा सेंट पॅट्रिक इंग्लिश स्कूल मैदान, जालना रोड येथे आयोजित करण्यात आली होता.
अत्यंत स्पर्धात्मक झालेल्या १७ वर्षांखालील गटात तल्हा फुटबॉल अकादमी संघाने विजेतेपद पटकावले. केंद्रीय विद्यालय बॉईज संघ उपविजेता ठरला. १४ वर्षांखालील गटात नोबल फुटबॉल अकादमीने विजेतेपद पटकावले, तर छत्रपती संभाजीनगर फुटबॉल क्लबने उपविजेतेपद संपादन केले.
सेंट पॅट्रिक स्पोर्ट्स अकादमीचे प्रशिक्षक अशरफ आणि विशाल यांनी या स्पर्धेचे कुशल व्यवस्थापन केले. सामन्याचे प्रतिष्ठित पाहुणे, विफा प्रमाणित फुटबॉल रेफरी आणि प्रशिक्षक शेख अझहर यांनी त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.