
ठाणे ः श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त व १०० व्या शिवजयंती उत्सवनिमित्य आयोजित केलेल्या ७२ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महिला गटात ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब ठाणे, आकाश स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगर, जय भारत स्पोर्ट्स क्लब ठाणे, होतकरू मित्र मंडळ ठाणे, डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर या संघांनी उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पुरुष गटात वीर पशुराम कबड्डी संघ मुंबई उपनगर, शिव शंकर क्रीडा मंडळ ठाणे, स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, चेंबूर क्रीडा केंद्र मुंबई उपनगर, सतेज संघ बाणेर पुणे, जय भवानी तरुण मंडळ करंजवडे मुंबई उपनगर या संघानी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
महिला गटातील पहिल्या सामन्यात ठाण्याच्या ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब संघाने मुंबई उपनगरच्या स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघाचा अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात ६ गुणांनी विजय मिळविला. वैष्णवी साळुंखेच्या उत्कृष्ट चढायांमुळे मध्यन्तराला ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब संघाने ७ गुणांची आघाडी घेतली होती. वैष्णवी साळुंखेने अतिशय सुरेख खेळ करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली व तिला श्रणीता घारावे हिने पक्कडीमध्ये सुंदर साथ दिली. पराभूत संघाकडून याशिका पुजारी ही एकाकी लढली.
दुसऱ्या सामन्यात ठाण्याच्या होतकरू मित्र मंडळाने चिपळूणच्या स्वराज्य स्पोर्ट्स अकॅडमी संघाचा १० गुणांनी पराभव केला. पहिल्या डावात रिया पारकर व साक्षी मकवाना यांच्या उत्कृष्ट चढायांमुळे होतकरू मित्र मंडळाने २ गुणांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात स्वराज्य स्पोर्ट्स अकॅडमी संघाच्या सारा शिंदे हिने आपल्या संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला.
पुरुष गटातील पहिल्या सामन्यात मुंबई उपनगरच्या चेंबूर क्रीडा केंद्र संघाने ठाण्याच्या आत्माराम क्रीडा मंडळाचा १० गुणांनी पराभव करीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. या सामन्यात कुणाल पवार, आकाश कदम ह्यांच्या सुंदर चढाया व शुभम घारे ह्याच्या उत्कुष्ट पक्कडीच्या साथीमुळे मध्यन्तराला चेंबूर क्रीडा केंद्र संघाने १८-११ अशी ७ गुणांची आघाडी घेतली. पराभूत संघाकडून हर्ष शेडगे याने छान खेळ केला.
दुसऱ्या सामन्यात मुंबई उपनगरच्या वीर पशुराम कबड्डी संघाने ठाण्याच्या उजाला क्रीडा मंडळाचा २ गुणांनी पराभव करीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला ९-९ असा सम-समान गुणांवर होता. मध्यन्तरानंतर मात्र वीर परशुराम संघाच्या अभिज्ञ डोलभर याने आक्रमक खेळ करीत सामन्याला गती दिली. तर, उजाला क्रीडा मंडळाच्या मोहित पाटील याने तेवढ्याच आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. परंतु सामन्याच्या शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना वीर परशुराम संघाच्या निखिलेश गावडे याने खोलवर चढाया करीत दोन गुण मिळवत आपल्या संघास विजय मिळवून दिला.
स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी अर्जुन पुरस्कार प्राप्त सदानंद शेट्ये, माया आक्रे, छत्रपती पुरस्कार प्राप्त मीननाथ धानजी, मीनल सावंत, ज्येष्ठ पत्रकार नवनाथ दांडेकर, सुनील सकपाळ, कबड्डी संघटक शशी राऊत यांचा खास सत्कार करण्यात आला.
तिसऱ्या दिवसाचे उत्कृष्ट खेळाडू
महिला गटात : वैष्णवी साळुंखे (ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब, ठाणे) आणि पुरुष गटात : शार्दूल पाटील (गुडमॉर्निंग स्पोर्ट्स क्लब, मुंबई शहर) यांची निवड करण्यात आली.