वैभवच्या वादळात गुजरातचे ‘टायटन्स’ बुडाले 

  • By admin
  • April 28, 2025
  • 0
  • 31 Views
Spread the love

वैभव सूर्यवंशी आयपीएल इतिहासातील पहिला युवा शतकवीर, तुफानी फलंदाजीत अनेक विक्रम मोडले 

जयपूर : चौदा वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या वादळी शतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्स संघाने गुजरात टायटन्स संघावर ८ विकेट राखून विजय साकारत आव्हान कायम ठेवले. वैभव सूर्यवंशी हा यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वात कमी चेंडूत शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. आयपीएल इतिहासातील सर्वात कमी वयात शतक ठोकणारा वैभव हा पहिलाच फलंदाज आहे. राजस्थान रॉयल्स संघाने १५.५ षटकात दोन बाद २१२ धावा फटकावत शानदार विजय साकारला. 

राजस्थान रॉयल्स संघासमोर विजयासाठी २१० धावांचे आव्हान होते. युवा वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल या सलामी जोडीने ११.५ षटकात १६६ धावांची भागीदारी करत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. वैभव सूर्यवंशी याने तुफानी फलंदाजी केली. चौफेर फटकेबाजी करताना वैभवने अवघ्या ३८ चेंडूत १०१ धावा काढत एक नवा इतिहास रचला. त्याने शतक ठोकताना तब्बल ११ टोलेजंग षटकार व सात चौकार मारले. वैभवने शानदार फलंदाजी करत मैदान दणाणून सोडले. वैभव सूर्यवंशी याने धमाकेदार शतक ठोकताना पहिला आयपीएल सामना खेळणाऱ्या करीम जनत याच्या गोलंदाजीवर तुटून पडला. वैभव याने करीमला तीन षटकार व तीन चौकार ठोकत ३० धावा वसूल केल्या. यंदाच्या आयपीएल हंगामातील हे सर्वात महागडे षटक ठरले. 

वैभव बाद झाल्यानंतर नितीश राणा ४ धावांवर बाद झाला. यशस्वी जयस्वाल व कर्णधार रियान पराग यांनी आक्रमक फलंदाजी कायम ठेवत गुजरात संघावर दबाव ठेवला. यशस्वी जयस्वालने ४० चेंडूत नाबाद ७० धावा फटकावल्या. त्याने नऊ चौकार व दोन षटकार मारले. रियान पराग याने १५ चेंडूत नाबाद ३२ धावांचे योगदान दिले. पराग याने विजयी षटकार ठोकला. त्याने दोन षटकार व दोन चौकार मारले. गुजरातकडून रशीद खान (१-२४) व प्रसिद्ध कृष्णा (१-४७) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 

टी २० मधील सर्वात युवा शतकवीर

वैभव सूर्यवंशी याने १४ वर्ष ३२ दिवसांचा असताना गुजरात टायटन्स संघाविरुद्ध शतक ठोकले. यापूर्वी महाराष्ट्राच्या विजय झोल याने मुंबई संघाविरुद्ध २०१३ मध्ये शतक ठोकले  होते, तेव्हा विजय १८ वर्ष ११८ दिवसांचा होता. 

वेगवान आयपीएल शतक
चेंडूंचा विचार करता वैभव सूर्यवंशी हा आयपीएल इतिहासातील दुसरा शतकवीर ठरला. ख्रिस गेल याने ३० चेंडूत शतक ठोकले होते. वैभव सूर्यवंशी याने ३५ चेंडूत शतक ठोकले. युसूफ पठाण याने ३७ तर डेव्हिड मिलर याने ३८ चेंडूत हा पराक्रम केला होता. 

शुभमन-बटलरची स्फोटक फलंदाजी 

गुजरात टायटन्स संघाने वादळी फलंदाजी करत २० षटकात चार बाद २०९ धावसंख्या उभारली. साई सुदर्शन व कर्णधार शुभमन गिल या सलामी जोडीने ९३ धावांची भागीदारी करत संघाला सुरेख सुरुवात करुन दिली. साई सुदर्शन याने ३० चेंडूत ३९ धावा फटकावल्या. त्याने चार चौकार व एक षटकार मारला. शुभमन गिल व जोस बटलर या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी करत डावाला आकार दिला. 

कर्णधार शुभमन गिल याने बहारदार फलंदाजी केली. गिल याने अवघ्या ५० चेंडूत ८४ धावा फटकावल्या. त्याने आपल्या वादळी खेळीत चार टोलेजंग षटकार व पाच चौकार मारले. गिल षटकार मारण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर रियान परागकडे झेलबाद झाला. वॉशिंग्टन सुंदर याला बढती देण्यात आली. सुंदर १३ धावांवर बाद झाला. राहुल तेवतिया ९ धावांवर तंबूत परतला. जोस बटलर याने अवघ्या २६ चेंडूत नाबाद ५० धावांची स्फोटक अर्धशतकी खेळी केली. बटलर याने चार उत्तुंग षटकार व तीन चौकार मारले. शाहरूख खान ५ धावांवर नाबाद राहिला. 

राजस्थान रॉयल्स संघाच्या थीकशन याने ३५ धावांत दोन गडी बाद केले. आर्चर (१-४९) व संदीप शर्मा (१-३३) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *