
क गटात पुण्याच्या अलौकिक सिन्हाला जेतेपद
पुणे : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने तिसऱ्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ओपन ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत अ गटात अर्मेनियाच्या पेट्रोस्यान मॅन्युएल याने तर, क गटात पुण्याच्या अलौकिक सिन्हा याने विजेतेपद संपादन केले.
अमनोरा हॉल येथील हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत १०व्या फेरीत अ गटात अर्मेनियाच्या पेट्रोस्यान मॅन्युएल याने मध्यप्रदेशच्या आयुष शर्माचा पराभव करून ७.५ गुण व टायब्रेक गुणांच्या जोरावर विजेतेपद पटकावले. दुसऱ्या पटावर जॉर्जियाच्या पँटसुलिया लेव्हन याने रशियाच्या सावचेन्को बोरिसला बरोबरीत रोखले व ७.५ गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. तर, रशियाच्या सावचेन्को बोरिस याने तिसरा क्रमांक पटकावला.
क (रेटिंग १८०० च्या खालील) गटात नवव्या फेरीत पहिल्या पटावर अलौकिक सिन्हा याने राम कुमार आरचा पराभव करून ८.५ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. दुसऱ्या पटावर लढतीत आदित्य खैरमोडे याने दगडू गायकवाडचा पराभव करून ८ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. पार्थ मोघे याने गोपीनाथ पी याचा पराभव करून ७.५ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.
स्पर्धेत एकूण ५० लाख रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सिटी कॉर्पोरेशनचे संचालक आदित्य देशपांडे, अमनोरा मॉलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरजीत सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, खजिनदार विलास म्हात्रे, सहसचिव राजेंद्र कोंडे, निनाद पेडणेकर, पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे, चीफ आर्बिटर आय ए श्रीवत्सन, डेप्युटी चीफ आर्बिटर चारवाक, एमसीए आर्बिटर कमिशन सदस्य दीप्ती शिदोरे, नितीन शेणवी, राजेंद्र शिदोरे आदी उपस्थित होते.