
क्रीडा भारतीची राज्य निमंत्रित कबड्डी स्पर्धा – छत्रपती संभाजीनगरला उपविजेतेपद
सोलापूर ः पावसामुळे नाणेफेकीच्या कौलावर पुण्याच्या प्रकाश तात्या बालवडकर संघाने राज्य निमंत्रित कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. छत्रपती संभाजीनगरच्या साई सेवा क्रीडा मंडळास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जयहिंद क्रीडा मंडळ श्रीरामपूरने तृतीय तर मिडलाईन मुंबईने चौथे स्थान मिळविले.
क्रीडा भारती, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ व भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा शिंदे चौकातील शिवस्मारक मैदानावर पार पडली. रविवारी रात्री उपांत्य सामने झाल्यानंतर पाऊस पडल्यामुळे मॅट ओले झाले होते. त्यामुळे अंंतिम सामना नसल्यामुळे नाणेफेकीचा करण्याचा निर्णय पंचानी घेतला. त्यात पुण्याने बाजी मारली.
तत्पूर्वी, झालेल्या उपांत्य सामन्यात पुण्याने श्रीरामपूरच्या जयहिंद क्रीडा मंडळाचा ४४-२९ असा पराभव केला. यात आदित्य शेळके व भाऊसाहेब गोराने यांनी उल्लेखनीय खेळी केली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात छत्रपती संभाजीनगरच्या साई सेवा क्रीडा मंडळाने मुंबईच्या मिडलाईन स्पोर्ट्स क्लबला ४४-२९ असे हरविले. यात राहुल टेके व रत्नेश धावणे यांनी प्रेक्षणीय खेळ केला. या स्पर्धेसाठी पंच प्रमुख म्हणून धाराशिवचे फुलचंद कदम व सहपंचप्रुमख म्हणून सोलापूर जिल्हा कबड्डी संघटनेचे सहसचिव जयंत मोरे यांनी काम पाहिले.
मुख्य सरकारी वकील ॲड प्रदीप सिंग राजपूत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. प्रथम चार संघाना अनुक्रमे एक लाख, ५०, २० व १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक व करंडक देण्यात आले.
यावेळी क्रीडा भारतीचे अध्यक्ष डॉ विलास हरपाळे, शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापुर, प्रांत मंत्री ज्ञानेश्वर म्यॅकल, सहमंत्री डॉ उज्वल मलजी व अरुण उपाध्ये आदी उपस्थित होते. क्रीडा भारतीचे सचिव राजेश कळमणकर यांनी सूत्रसंचालन केले.