
पुरुष गटात विजेतेपद, महिला गटात उपविजेतेपद
छत्रपती संभाजीनगर ः राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने तिहेरी यश संपादन करुन स्पर्धा गाजवली. महाराष्ट्र पुरुष संघाने विजेतेपद तर महिला संघाने उपविजेतेपद पटकावले.
बालविकास इंग्लिश स्कूल, दक्षिणा कनडा कर्नाटक या ठिकाणी राष्ट्रीय डॉजबॉल पुरुष व महिला तसेच मिश्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने तिनही गटात आपला दबदबा कायम ठेवत पुरुष गटात सुवर्णपदक, महिला गटात रौप्यपदक व मिश्र गटात कांस्य पदक असे तिहेरी यश संपादन केले.
महाराष्ट्र पुरुष संघाने छत्तीसगड (३-१), गोवा (३-०), बिहार (२-१), पद्दुचेरी (२-१) या संघांना नमवून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत हरियाणा संघाला महाराष्ट्र संघाने २-१ असे पराभूत करुन विजेतेपद पटकावले. या विजेत्या संघात कुणाल राठोड (कर्णधार), वरद शिंपी (उपकर्णधार), निखिल म्हस्के, सिद्धेश दरेकर, सुयश साळवे, अयान मुनीर तांबोळी, आदित्य मंदे, विक्रम जैस्वाल, हर्ष यादव, आर्यन पाटील, सर्वेश पाटील, मितांशु करपे, करमन सिंग हुंडल या खेळाडूंचा समावेश आहे. या संघाचे प्रशिक्षक म्हणून रमेश शिंदे व व्यवस्थापक म्हणून वर्षा नलावडे यांनी काम पाहिले.
महिला गटात महाराष्ट्र संघानेउपविजेतेपद संपादन केले. या स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने गोवा (३-०), उत्तर प्रदेश (३-१), तामिळनाडू (३-१) या संघांचा पराभव करुन अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत कर्नाटक संघाने महाराष्ट्र संघाला २-१ असे पराभूत केले. त्यामुळे महाराष्ट्र संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या संघात स्नेहा पवार (कर्णधार), मेहरुन्निसा तस्लिमा शेख (उपकर्णधार), दीक्षा बोराडे, तेजस्विनी गोरे, पल्लवी खरगे, वृंदा सिंग, तिथी प्रामाणिक, श्रावणी दिवेकर, आरती पाटील, लास्य राव, रिद्धी खैरनार, राजनंदिनी जोगळेकर यांचा समावेश आहे. या संघाला प्रशिक्षक महेंद्र मोटघरे व व्यवस्थापक प्रियांका कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
मिश्र गटात महाराष्ट्र संघाने कांस्य पदक जिंकले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने छत्तीसगड (३-१), राजस्थान (२-०), जम्मू (२-२) या संघांविरुद्ध शानदार खेळ केला. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात महाराष्ट्र संघाने पद्दुचेरी संघावर २-१ असा विजय नोंदवला. या संघात सिद्धेश दरेकर, दीक्षा बोराडे, वरद शिंपी, निखिल म्हस्के, कुणाल राठोड, मेहरुन्निसा तस्लिमा शेख, प्राची वेळंजकर, सयावी भोसले, प्रियदर्शनी दळवी, रणवीर गुलमकर, वेदांत देवरे, समर्थ मळेकर, गायत्री जाधव या खेळाडूंचा समावेश आहे. या संघाला प्रशिक्षक अभिजीत साळुंके, व्यवस्थापक स्नेहा पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत निखिल म्हस्के व सयावी भोसले यांना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्रदान करुन गौरवण्यात आले. या शानदार कामगिरीबद्दल डॉजबॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार, महासचिव प्रा एकनाथ साळुंके, संजय मोरे, डॉ संदीप जगताप, डॉ उदय डोंगरे, गोकुळ तांदळे आदींनी विजेत्यांचे अभिनंदन केले.