
मुंबई : भारतीय स्नूकर चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ! वरळी येथील एनएससीआय क्लबमध्ये २८ एप्रिल ते ११ मे दरम्यान रंगणाऱ्या एनएससीआय बॉल्कलाइन ४.० स्नूकर स्पर्धेत यंदा बक्षीस रक्कम दुपटीने वाढवली असून एकूण ३२ लाख रुपये ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेचा विजेता थेट ५ लाख रुपये बक्षीस घेऊन जाणार आहे.
या प्रतिष्ठित स्पर्धेत देशभरातील अव्वल ३२ स्नूकरपटू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. यामध्ये गतविजेता पंकज अडवानी, भारताचे दोन प्रो-खेळाडू इशप्रीत सिंग चढ्ढा आणि क्रिश गुरबक्षनी, तसेच एकमेव परदेशी खेळाडू मार्टिन गुडॉल यांच्यासह ब्रिजेश दमानी आणि रायन राझमी यासारख्या नामवंत खेळाडूंचा समावेश आहे.
याशिवाय, महाराष्ट्रातील उभरते ज्युनियर आणि सब-ज्युनियर गटातील स्टार खेळाडूही चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. स्पर्धेच्या प्रारंभिक पात्रता फेरीत १६ खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळणार असून मुख्य फेरीत उर्वरित १२ खेळाडू त्यांच्याशी दोन हात करतील. स्पर्धेचा थरारक महाअंतिम सामना ११ मे रोजी रंगणार आहे.
एनएससीआय बॉल्कलाइन ४.० मध्ये बक्षीस रक्कमेत ५० टक्क्यांहून अधिक वाढ करण्यात आल्याने, यंदाची स्पर्धा अधिक रोमांचक आणि स्पर्धात्मक होणार, यात शंका नाही.