एमसीएतर्फे शुभांगी कुलकर्णी, केदार जाधव यांचा सन्मान 

  • By admin
  • April 29, 2025
  • 0
  • 44 Views
Spread the love

महावंदन एमसीए अवॉर्ड्स २०२५ : अजय शिर्के-महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमी स्थापनेची घोषणा 

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे शुभांगी कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार आणि केदार जाधव यांना एमसीए लिजेंडरी क्रिकेटर पुरस्कार प्रदान करुन गौरवण्यात आले. अजय शिर्के-महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमी स्थापनेची घोषणा एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांनी यावेळी केली. तसेच सहा जिल्हा संघटनांना प्रत्येकी ७५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. 

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित ‘महावंदन एमसीए अवॉर्ड्स २०२५’ हा पुरस्कार वितरण सोहळा काल पंडित फार्म्स, पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र क्रिकेटच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या खेळाडू, कोचेस, फिटनेस ट्रेनर्स, सपोर्ट स्टाफ, एमपीएल व डब्ल्यूएमपीएल संघमालक यांचा या सोहळ्यात सत्कार करण्यात आला.

जिल्हा क्रिकेट स्तरावर सुविधा व पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी, तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, एमसीएने सहा जिल्हा क्रिकेट संघटनांना प्रत्येकी ७५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. भविष्यात सर्व जिल्हा संघटनांना ही मदत देण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

या सोहळ्यात माजी भारतीय कर्णधार, विद्यमान बीसीसीआय अपेक्स कौन्सिल सदस्या आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या शुभांगी कुलकर्णी यांना त्यांच्या क्रिकेट क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच प्रसिद्ध क्रिकेटपटू केदार जाधव यांना महाराष्ट्र आणि भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘एमसीए लिजेंडरी क्रिकेटर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

तसेच, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी ‘नॅशनल क्रिकेट अकॅडमी’च्या धर्तीवर एमसीएची स्वतःची अकॅडमी स्थापन करण्याची घोषणा केली. या अकॅडमीला ‘अजय शिर्के – महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमी’ हे नाव देण्यात आले असून लवकरच रिजनल स्तरावरही अकॅडमीची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

कार्यक्रमादरम्यान एमसीए इंटरनॅशनल क्लबच्या आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या लाईव्ह परफॉर्मन्सने, तसेच अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांची गणेश वंदना आणि शाहीर रामानंद उगले यांच्या जोशपूर्ण पोवाड्याने वातावरण दिमाखदार झाले.

या सोहळ्यास एमसीए पदाधिकारी, सर्व जिल्हा क्रिकेट संघटनांचे पदाधिकारी, खेळाडू, कोचेस, सपोर्ट स्टाफ, संघमालक, निवड समिती सदस्य, क्लब प्रतिनिधी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रिकेट विकासासाठी कटिबद्ध 
यावेळी अध्यक्ष रोहित पवार म्हणाले, “महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन नेहमीच ग्रासरूट क्रिकेटच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. एमसीएची स्वतःची अकॅडमी स्थापनेची घोषणा हा त्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. आज शुभांगी
कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार देताना आम्हाला अभिमान वाटतो. महाराष्ट्र क्रिकेटला अधिक भव्य रूप देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहू, याची मी खात्री देतो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *