< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); सतेज, स्वस्तिक, चेंबूर क्रीडा केंद्र, शिव शंकर उपांत्य फेरीत – Sport Splus

सतेज, स्वस्तिक, चेंबूर क्रीडा केंद्र, शिव शंकर उपांत्य फेरीत

  • By admin
  • April 29, 2025
  • 0
  • 65 Views
Spread the love

श्री मावळी मंडळाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

ठाणे : श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त आणि १०० व्या शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ७२ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या चौथ्या दिवशीच्या सामन्यात पुरुष गटात सतेज संघ, बाणेर, पुणे, स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर, चेंबूर क्रीडा केंद्र, मुंबई उपनगर, शिव शंकर क्रीडा मंडळ, ठाणे या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर महिला विभागात होतकरू मित्र मंडळ ठाणे, डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर, शिवशक्ती महिला संघ मुंबई शहर, शिवशक्ती महिला संघ धुळे यांनी उपांत्य फेरी गाठली.

पुरुष गटातील पहिल्या उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात पुण्याच्या सतेज संघाने मुंबई शहर जयभारत क्रीडा मंडळाचा ४९-२४ असा आरामात पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. या सामन्यात जयभारत क्रीडा मंडळाने सतेज संघावर पहिल्या ५ मिनिटातच लोण टाकत अतिशय आक्रमक सुरुवात केली. परंतु पहिल्या लोननंतर सतेज संघाच्या पृथ्वीराज शिंदे व आदित्य गोरे यांनी खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या भराभर वाढवली. मध्यंतराला  २०-१४ अशी १४ गुणांची आघाडी सतेजकडे होती. शिंदे-गोरे यांना अक्षय जाधवने सुरेख पक्कडी करुन चांगली साथ दिली. पराभूत संघाच्या अनिकेत मिटलेची लढत एकाकी ठरली.

पुरुष गटातील दुसऱ्या उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या चेंबूर क्रीडा केंद्राने ठाण्याच्या श्री समर्थ क्रीडा मंडळाचा चुरशीच्या लढतीत ३६-३१ असा ५ गुणांनी पराभव करुन उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात आकाश कदम व कुणाल पवार ह्यांच्या शानदार चढायांमुळे चेंबूर क्रीडा केंद्राने  मध्यन्तराला ९ गुणांची आघाडी घेतली होती.  तिचं निर्णायक ठरली. मध्यन्तरानंतर श्री समर्थ क्रीडा मंडळाच्या प्रणित पाटीलने खोलवर चढाया करुन बरेच गुण मिळवले. परंतु त्याला इतर खेळाडूंची साथ न मिळाल्यामुळे श्री समर्थ क्रीडा मंडळाने हा सामना गमावला.

महिला विभागात पहिल्या उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात धुळ्याच्या शिवशक्ती महिला संघाने ठाण्याच्या ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब संघाचा अटीतटीच्या सामन्यात २९-२७ असा २ गुणांनी पराभव केला. या सामन्यात शिवशक्ती महिला संघाच्या विद्या डोलताडे, प्रज्ञा बाबर यांनी सामन्याच्या पहिल्या चढाईपासून आक्रमक चढाया करीत मध्यन्तरापर्यंत आपल्या संघाला ९ गुणांची आघाडी मिळवून दिली. विश्रांती नंतर ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब संघाच्या  वैष्णवी साळुंखेने शानदार चढाया करुन आपल्या संघाची गुणसंख्या भराभर वाढवू सामन्यात रंगत आणली. सामन्यातील शेवटचे १ मिनिट शिल्लक असताना शिवशक्ती महिला संघाने वैष्णवी साळुंखेची पक्कड करुन हा सामना २ गुणांनी जिंकला. 

दुसऱ्या सामन्यात ठाण्याच्या होतकरू मित्र मंडळाने मुंबई उपनगरच्या आकाश स्पोर्ट्स क्लब संघाचा २८-२० असा सहज पराभव करुन उपांत्य फेरी गाठली. विजयी संघाच्या ऐश्वर्या राऊत व रिया पारकर यांच्या तुफानी चढायांमुळे  मध्यंतराला होतकरू मित्र मंडळाने ९ गुणांची आघाडी घेतली होती. होतकरू संघाच्या नंदिनी बईत हिने सुरेख पकडी केल्या. पराभूत संघाकडून धनश्री कोकाटे छान खेळली.

स्पर्धेच्या चौथ्या दिवशी जीवनगौरव पुरस्कारप्राप्त शकुंतला खटावकर, अर्जुन पुरस्कार प्राप्त मोनिका नाथ-बाक्रे, छत्रपती पुरस्कार प्राप्त चित्रा नाबर, प्रताप शेट्टी, राजेश पाडावे, कृष्णकुमार कोळी, जिजामाता पुरस्कार प्राप्त सुषमा सहस्रबुद्धे, राष्ट्रीय खेळाडू वासंती बोर्डे, भूषण पाटील, अशोक कोळी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *