
फाफ डु प्लेसिसचे अर्धशतक व्यर्थ; सुनील नरेन, वरुण चक्रवर्तीची प्रभावी गोलंदाजी
दिल्ली : फिरकी गोलंदाज सुनील नरेन (३-२९) याच्या प्रभावी कामगिरीच्या बळावर गतविजेत्या केकेआर संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा १४ धावांनी पराभव केला. गेल्या तीन सामन्यात पराभूत झाल्यानंतर केकेआर संघाला विजयाचे टॉनिक लाभले आहे. फाफ डु प्लेसिसची आक्रमक अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली.
दिल्ली कॅपिटल्स संघासमोर विजयासाठी २०५ धावांचे आव्हान होते. प्रत्युत्तरात दिल्ली संघाची अतिशय खराब सुरुवात झाली. दिल्ली संघाने पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विकेट गमावली. अभिषेक पोरेल याने २ चेंडूत ४ धावा काढल्या. अनुकुल रॉय याने त्याची विकेट घेतली. त्यानंतर करुण नायर १३ चेंडूत १५ धावा काढून बाद झाला. नायर याने दोन चौकार मारले. सध्या फॉर्मात असलेला केएल राहुल ७ धावांवर धावबाद झाला. हा दिल्ली संघासाठी मोठा धक्का होता. राहुल धावबाद झाला तेव्हा दिल्ली संघाची स्थिती ६.३ षटकात तीन बाद ६० अशी बिकट झाली होती.

तीन बाद ६० अशा बिकट स्थितीत अनुभवी फलंदाज फाफ डु प्लेसिस आणि कर्णधार अक्षर पटेल या जोडीने चौथ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करत डाव सावरला. परंतु, सुनील नरेन याने अक्षर पटेल याला ४३ धावांवर बाद करुन मोठा धक्का दिल्ली संघाला दिला. अक्षर पटेल याने अवघ्या २३ चेंडूत ४३ धावांची खेळी करुन सामन्यात रंगत आणली होती. त्याने तीन टोलेजंग षटकार व चार चौकार मारले. पाठोपाठ ट्रिस्टन स्टब्स (१) याला सुनील नरेन याने क्लीनबोल्ड करुन पाचवा धक्का दिल्लीला दिला. त्यानंतर फाफ डु प्लेसिसवर संघाची सर्व भिस्त होती. एका बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत असताना फाफ याने ४० चेंडूत ६२ धावांची दमदार खेळी साकारली. त्याने सात चौकार व दोन षटकार मारले. फाफ बाद झाल्यानंतर दिल्लीच्या विजयाची शक्यता धुसर बनली. वरुण चक्रवर्ती याने आशुतोष शर्मा (७) व मिचेल स्टार्क (०) यांना लागोपाठ बाद करुन दिल्लीचा पराभव निश्चित केला. विप्रज निगम याने १९ चेंडूत ३८ धावा फटकावत थोडा प्रतिकार केला. त्याने पाच चौकार व दोन षटकार मारले. दिल्लीने २० षटकात नऊ बाद १९० धावा काढल्या. सुनील नरेन (३-२९), वरुण चक्रवर्ती (२-३९) यांनी प्रभावी गोलंदाजी करत संघाला १४ धावांनी विजय मिळवून दिला.
केकेआरची दमदार फलंदाजी
अंगकृष रघुवंशीच्या ४४ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर २०५ धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या केकेआरने २० षटकांत नऊ गडी गमावून २०४ धावा केल्या. दिल्लीकडून मिचेल स्टार्क याने तीन तर विप्रज निगम आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. त्याच वेळी, दुष्मंथा चामीरा याने एक गडी बाद केला.
या सामन्यात रहमानउल्लाह गुरबाज आणि सुनील नारायण यांनी दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ४८ धावांची भागीदारी झाली. स्टार्क याने गुरबाजला आपला बळी बनवले. तो १२ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २६ धावा काढून बाद झाला. यानंतर विप्रज निगमने सुनील नरेन याला पायचीत बाद केले. तो २७ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेने काही चांगले फटके खेळले आणि २६ धावा करण्यात यश मिळवले. अंगकृष रघुवंशीने रिंकू सिंगसह दिल्लीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. चमिरा याने रघुवंशी याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तो ३२ चेंडूत ४४ धावा करून बाद झाला तर रिंकूने तीन चौकार आणि एका षटकारासह ३६ धावांची चांगली खेळी केली. त्याच वेळी, व्यंकटेश अय्यरची बॅट आज शांत राहिली. तो फक्त सात धावा करू शकला तर रसेल त्याच्या वाढदिवसाला १७ धावा करून धावबाद झाला. रोवमन पॉवेलने पाच धावा केल्या आणि अनुकुल रॉयला खातेही उघडता आले नाही. हर्षित राणा खाते न उघडता नाबाद राहिला आणि वरुण चक्रवर्तीने नाबाद १ धाव केली.