
रेल्वेची स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धा ः पृथ्वीराज मिसाळ व परमजीत कदमची शानदार शतके, प्रवीण देशेट्टीचा अष्टपैलू खेळ
सोलापूर ः रेल्वेच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेतील अ गटाच्या सामन्यात पृथ्वीराज मिसाळ व परमजीत कदमची शानदार शतके आणि प्रवीण देशेट्टीचा अष्टपैलू खेळाच्या जोरावर मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूट संघा आर एन स्टार इलेव्हनवर तब्बल २५० धावांनी दणदणीत विजय मिळवला.
येथील रेल्वे मैदानावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रेल्वेने निर्धारित ४० षटकांत ३ बाद ३९४ धावांचा डोंगर उभा केला. यात सलामीच्या पृथ्वीराज मिसाळ (१५०) व परमजीत कदम (१२७) यांनी शानदार शतके झळकाविली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी २२५ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. प्रवीण देशेट्टीनेही नाबाद ८९ धावा करीत अर्धशतकी खेळी केली. ३९५ धावांचे अवघड लक्ष्य आर एन स्टार इलेव्हनला पेलवले नाही. त्यांचा डाव रेल्वे संघाने १४४ धावांतच गुंडाळला. परमजीत (३ बळी) व प्रवीणने (२ बळी) गोलंदाजीत कामगिरी करीत संघाच्या विजयात अष्टपैलू खेळी केली. परमजीत व पृथ्वीराज यांना सामनावीर पुरस्कार विभागून देण्यात आले. रेल्वेचे लियाकत शेख व अक्षय भोसले यांच्या हस्ते त्यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. प्रत्येक सामनावीर पुरस्कार सुदेश व सुनील मालप यांच्याकडून देण्यात येत आहेत. पंच म्हणून चंदू मंजेली व नितीन गायकवाड तर गुणलेखक म्हणून सचिन गायकवाड यांनी काम पाहिले.
संक्षिप्त धावफलक
मध्ये रेल्वे इन्स्टिट्यूट सोलापूर : ४० षटकांत ३ बाद ३९४ (पृथ्वीराज मिसाळ १५०, परमजीत कदम १२७, प्रवीण देशेट्टी नाबाद ८९ धावा, शफी शेख व आनंद उदगीकर प्रत्येकी १ बळी) विजयी विरुद्ध आर. एन. स्टार इलेव्हन : ३१.२ षटकांत सर्वबाद १४४ (आकाश भोसले ४२, आनंद उदगीकर ३५, शाहिद शेख २२ धावा, परमजीत कदम व अनिश मुळे ३ बळी, प्रवीण देशेट्टी २ बळी).