आरोग्य विद्यापीठात नवसंशोधनाला दिशा देण्याचे प्रयत्न  

  • By admin
  • April 30, 2025
  • 0
  • 2 Views
Spread the love

कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन

नाशिक ः आरोग्य शिक्षण आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून नवसंशोधनाला मूर्त रुप देण्यासाठी स्टार्टअपच्या माध्यमातून नवसंशोधकांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या डिपार्टमेेट ऑफ इनोव्हेशन अँड सिस्टीम फोर हेल्थ केअर असोसिएशन मार्फत विद्यापीठात उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानी कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) होत्या. व्यासपीठावर ’दिशा’चे संचालक ब्रिगेडिअर सुबोध मुळगुंद, डॉ अभय कुलकर्णी, दिशाचे सीईओ अनिल भारती, रामाशिश मुंदडा उपस्थित होते.

या प्रसंगी कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात इनक्युबेशन आणि स्टार्टअपद्वारे रुग्णसेवेत मोठी क्रांती घडणार आहे. यासाठी आरोग्य शिक्षण व तंत्रज्ञान यांच्या मदतीने उदयोन्मुख नवसंशोधकांना संधी देण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रात आवश्यक साहित्य, वैद्यकीय उपकरणे यांत नाविन्यपूर्ण संशोधन केलेल्या एक्युबेटर्सची ही परिषद महत्वपूर्ण ठरणार आहे. टेक्नॉलॉजी रिडिंगनेस लेव्हल सिक्स टू एट दरम्यान नाविन्यपूर्ण उत्पादने विकसित आणि प्रदर्शित करणाऱया स्टार्ट-अप्सकडून मागणी करण्यात आली होती. यामध्ये इनक्युबेशन प्रवर्गासाठी मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला. स्टार्ट-अप्स मधील उत्तम दहा स्टार्ट-अप्स इनक्युबेटर्सला त्यांच्या नवकल्पना मांडण्यासाठी विद्यापीठाच्या ’दिशा’ कडून  मंच उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, नवनिर्मितीच्या पैलूंबद्दल विद्यार्थी आणि नवसंशोधक यांच्यात चर्चा होणे गरजेचे आहे. नवसंशोधकांनी समाजात आवश्यक उपकारांमध्ये मागणी केल्यानुसार बदल करणे त्यांचे मुल्यांकन यासाठी व्यासपीठ असणे आवश्यक आहे. औषध निर्माण शास्त्रात संशोधनांच्या मोठया प्रमाणात संधी आहेत. जगभरातील संशोधाकांच्या कार्याचा आढावा घेऊन आपल्याकडील आरोग्य शास्त्रातील समस्या जाणून घेऊन निराकरण करणे आवश्यक आहे. विद्यापीठाचा ’चक्र’ उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण व उपयोजित ज्ञान प्रकट करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

’दिशा’चे सीईओ अनिल भारती यांनी उपक्रमाविषयी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकमध्ये माहिती दिली. उद्घाटन समारंभात सानिया भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. या पिचिंग इव्हेंटकरीता  सत्तरपेक्षा अधिक प्रतिनिधी, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमास विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *