
अविनाश पांचाळ, जया बारगजे, गौरी मुंदडा, प्रणवकुमार सिरसाठ यांना पुरस्कार जाहीर
बीड ः क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती बीड मार्फत जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा संघटक/कार्यकर्ता पुरस्कारासाठी तायक्वांदो खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश पांचाळ, महिला प्रशिक्षिक आणि तायक्वांदो संघटक जया बारगजे, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते खेळाडू गौरी मुंदडा व प्रणवकुमार सिरसाठ यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रशिक्षक, संघटक, खेळाडूंच्या जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील कामगिरी, योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनातर्फ सन २०१९-२०२० वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्कार नियम २०१७ नुसार जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (१), गुणवंत खेळाडू (१ पुरुष व १ महिला), गुणवंत क्रीडा संघटक / कार्यकर्ता (१) असे एकून ४ जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समितीद्वारा जाहीर करण्यात आले आहेत.

चारही पुरस्कार विजेते तायक्वांदो खेळातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक आहेत. पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख १० हजार रुपये असे आहे. १ ते १० जानेवारी २०२५ या कालावधीत पुरस्कार प्रस्ताव मागविण्यात आले होते. सदर प्राप्त प्रस्तावांची तज्ञ समितीद्वारा छाननी करण्यात आली असून उपरोक्त पुरस्कारार्थीची जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती मार्फत निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या पुरस्कारार्थींना १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य दिनी उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते पोलिस मुख्यालय येथे सकाळी ध्वजारोहन प्रसंगी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

या सर्व विजयी पुरस्कारार्थांनी वेळेवर उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी अनिकेत काळे (9604959678) यांच्याशी संपर्क साधावा असे अवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.
क्रीडा पुरस्कार
गुणवंत खेळाडू (महिला) पुरस्कार – गौरी कमलेश मुंदडा.
गुणवंत खेळाडू (पुरूष) पुरस्कार – प्रणवकुमार दत्ता शिरसाठ.
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार – अविनाश भरतराव पांचाळ.
गुणवंत क्रीडा संघटक आणि कार्यकर्ती पुरस्कार – जयश्री अविनाश बारगजे.