
श्रेयस अय्यर, प्रभसिमरन सिंग यांची दमदार अर्धशतके, युजवेंद्र चहलची हॅटट्रिक निर्णायक
चेन्नई : कर्णधार श्रेयस अय्यर (७२), प्रभसिमरन सिंग (५४) आणि युजवेंद्र चहल (४-३२) यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर पंजाब संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर चार विकेट राखून पराभूत केले. या विजयासह पंजाबने १३ गुणांसह आयपीएल गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. पंजाबचा हा सहावा विजय आहे तर चेन्नई संघाचा हा आठवा पराभव आहे.
पंजाब किंग्ज संघासमोर विजयासाठी १९१ धावांचे लक्ष्य होते. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग ही आक्रमक सलामी जोडी मैदानात उतरली. या जोडीने ४.४ षटकात ४४ धावांची सलामी दिली. प्रियांश आर्य याने १५ चेंडूत २३ धावा काढल्या. खलील अहमद याने त्याला बाद केले. त्याने पाच चौकार मारले. त्यानंतर प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर या जोडीने बहारदार फलंदाजी करत धावफलक हलता ठेवला. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करत संघाचा विजय सुकर बनवला. प्रभसिमरन सिंग याला नूर अहमदने बाद केले. त्याने ३६ चेंडूत ५४ धावा काढल्या. त्याने पाच चौकार व तीन उत्तुंग षटकार मारले. नेहल बधेरा आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात ५ धावांवर बाद झाला.

१४.३ षटकात तीन बाद १३६ धावसंख्या असताना श्रेयस अय्यर व शशांक सिंग या जोडीने ४४ धावांची जलद भागीदारी करत संघाला विजयासमीप आणले. शशांक सिंग २३ धावांवर बाद झाला. ब्रेव्हिस याने सीमारेषेवर उत्कृष्ट झेल घेऊन शशांकला तंबूत पाठवले. त्याने १२ चेंडूत दोन षटकार व एक चौकार मारला. कर्णधार श्रेयस अय्यर याने बहारदार फलंदाजी केली. १९व्या षटकात अय्यरची धमाकेदार खेळी ७२ धावांवर संपुष्टात आली. तेव्हा पंजाबला विजयासाठी फक्त ३ धावांची गरज होती. अय्यर याने ४१ चेंडूंचा सामना करताना पाच चौकार व चार टोलेजंग षटकार मारले. जोश इंगलिस (नाबाद ६) आणि जॅनसेन (नाबाद ४) यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पंजाबने १९.४ षटकात सहा बाद १९४ धावा फटकावत चार विकेटने सामना जिंकला. मधीशा पाथिराणा याने ४५ धावांत दोन तर खलील अहमद याने २८ धावांत दोन विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा (१-३२) व नूर अहमद (१-३९) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
सॅम करनची धमाकेदार फलंदाजी
चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना १९.२ षटकात सर्वबाद १९१ धावसंख्या उभारली. सॅम करन याने ४७ चेंडूत ८८ धावांची वादळी खेळी केल्यामुळे चेन्नई संघाला २०० धावांपर्यंत मजल मारता आली. शेख रशीद (११), आयुष म्हात्रे (७) ही सलामी जोडी स्वस्तात बाद झाली. त्यानंतर सॅम करन याने आपल्या आक्रमक फलंदाजीने डाव सावरला. करन याने ८८ धावा फटकावताना चार टोलेजंग षटकार व नऊ चौकार ठोकले. करन याच्यानंतर डेवॉल्ड ब्रेव्हिस याने २६ चेंडूत ३२ धावांची खेळी करत डावाला आकार दिला. त्याने दोन चौकार व एक षटकार मारला.

रवींद्र जडेजा, शिवम दुबे (६) हे आक्रमक फलंदाज झटपट बाद झाले. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने ४ चेंडूत एक षटकार व एक चौकार ठोकून ११ धावा काढल्या. चहल याने धोनीला बाद केले आणि पाठोपाठ दीपक हुडा (२), अंशुल कंबोज (०), नूर अहमद (०) यांना बाद करुन हॅटट्रिकसह चार विकेट घेण्याचा पराक्रम केला. त्यामुळे चेन्नईचा डाव १९१ धावसंख्येवर संपुष्टात आला. चहल याने ३२ धावांत चार विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग (२-२५) व मार्को जॅनसेन (२-३०) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
पंजाबकडून हॅटट्रिक घेणारा चौथा गोलंदाज
३४ वर्षीय गोलंदाज चहलने या सामन्यात आपले फिरकी जाळे पसरवले आणि चेन्नईच्या फलंदाजांना अडचणीत आणले. १९ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने धोनीला आपला बळी बनवले. त्यानंतर, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर, दीपक हुडा, अंशुल कंबोज आणि नूर अहमद यांना अनुक्रमे पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात आले. यांसह, चहल हा पंजाब किंग्जकडून हॅटट्रिक घेणारा चौथा गोलंदाज बनला. या बाबतीत त्याने सॅम करन आणि अमित मिश्रा यांची बरोबरी केली. या दोघांनीही आयपीएलमध्ये या संघासाठी प्रत्येकी एकदा हॅटट्रिक घेतली आहे. या प्रकरणात अव्वल स्थानावर युवराज सिंग आहे, त्याने पंजाब किंग्ज संघाकडून खेळताना दोनदा हॅटट्रिक घेतली आहे.