
राज्य कलरीपयत स्पर्धा
सोलापूर ः नांदेड येथील गुरू गोविंद सिंह स्टेडियममध्ये झालेल्या तिसऱया महाराष्ट्र राज्य कलरीपयत स्पर्धेत सोलापूर शहरातील रुद्र अकादमी ऑफ मार्शल आर्ट्स व योग संस्थेच्या कलरीपटूंनी पाच सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य पदके जिंकून राज्य संघात स्थान मिळवले.
कलरीपयत असोसिएशन सोलापूरतर्फे सहभागी झालेल्या वरिष्ठ मुलांच्या गटात समिहान कुलकर्णी याने कायपोरु (ओपन हँड फाईट) व हाय कीक या दोन्ही प्रकारात तर वरिष्ठ मुलींच्या गटात संस्कृती देशपांडे हिने कायपोरु प्रकारात सुवर्णपदके पटकावली. कनिष्ठ मुले गटात संस्कार कदमने हाय कीक प्रकारात तर कनिष्ठ मुली गटात वैष्णवी नरोटे हिने चुवाडक्कल (काल्पनिक आक्रमण – प्रतिक्रमण रचना ) प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
कनिष्ठ मुले गटात हृषिकेश डोके याने रौप्य तसेच कनिष्ठ मुले गटात चुवाडक्कल प्रकारात अंश सोलसकर व कनिष्ठ मुली गटात मृणाल महामुरे यांनी कांस्य पदके मिळवली. अपूर्वा व अभिराम कुलकर्णी यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले.
सर्व विजेते खेळाडू ३० मे ते २ जून पर्यंत त्रिवेंद्रम येथे होणा-या राष्ट्रीय कलरीपयत स्पर्धेत निलेश वाळिंबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख दशरथ काळे यांच्या सहकार्याने सहभागी होतील. सर्व यशस्वींना भुवनेश्वरी व मिहिर सुरेश जाधव यांच्याकडून प्रशिक्षण, आकाश झळकेनवरु यांचे समन्वय व रुद्र संचालिका संगीता सुरेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
अनुष्काची खेलो इंडिया युथ गेम साठी निवड
बिहार येथे होणाऱया खेलो इंडिया युथ गेम्स साठी रुद्र अकादमीची अनुष्का पल्ली ही कलरीपटू कनिष्ठ मुलींच्या गटात हाय कीक प्रकारात महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.