मुंबई पोलिस संघाला चौथ्यांदा विजेतेपद

  • By admin
  • May 2, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

दहावी मित्सुई शोजी टी २० क्रिकेट लीग : आर्यराज निकम सर्वोत्तम खेळाडू

मुंबई ः मुंबई पोलिस सिटी रायडर्स संघाने ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि एमसीसी आयोजित दहाव्या मित्सुई शोजी टी २० क्रिकेट लीग स्पर्धेत बलाढ्य शिवाजी पार्क वॉरियर्स संघावर चार धावांनी निसटता विजय मिळवत चौथ्यांदा या स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळवला.

शिवाजी पार्क वॉरियर्स संघाचा कर्णधार हार्दिक तामोरे याने नाणेफेक जिंकून मुंबई पोलिसांना प्रथम फलंदाजी दिली. सुनील पाटील (३१) आणि आर्यराज निकम (८०) यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करताना ५७ धावांची सलामी दिली. आर्यराजने नंतर हर्ष आघाव (३७) यांच्यासह चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागी तर सातव्या क्रमांकावर आलेल्या रोहित पोळ (नाबाद २७) यांच्यासह सहाव्या विकेटसाठी आणखी ५४ धावांची भागी रचत आपल्या संघाला २० षटकांत ६ बाद २२१ धावांचे लक्ष्य उभारून दिले. आर्यराजने ५० चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांसह ८० धावा केल्या. शिवाजी पार्क वॉरियर्स संघासाठी साईराज पाटील याने ४१ धावांत २ बळी मिळविले. भरवशाचे गोलंदाज मोहित अवस्थी (४ षटकांत ५० धावा) आणि रॉयस्टन डायस (४ षटकांत ५६ धावा) चांगलेच महागडे ठरले.

या आव्हानाचा पाठलाग करताना वॉरियर्स संघाने पॉवर प्लेच्या ६ षटकांत ६७ धावा करून तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण या स्पर्धेत दोन शतके करणारा सुवेद पारकर (८) आणि हार्दिक तामोरे (२१) मात्र तंबूत परतले. वरुण लवंडे (३७) बाद झाल्यानंतर अग्नी चोप्रा (५८) आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीसाठी आलेल्या सिद्धांत सिंग (५२) यांनी पाचव्या विकेटसाठी तडाखेबाज ८८ धावांची भागीदारी केल्याने १५ व्या षटका अखेर त्यांनी ५ बाद १८३ अशी मजल मारून विजय दृष्टीपथात आणला होता, शेवटच्या पाच षटकांत ३९ धावांची आवश्यकता असताना सिद्धांत बाद झाला.

कर्णधार सुनील पाटीलने स्वतः गोलंदाजी घेतली आणि आपल्या पहिल्याच षटकात अंकोलेकर आणि देव पटेल यांना तंबूचा रास्ता दाखवला. नंतरच्या षटकात त्याने बहरात असलेल्या अग्नी चोप्राला बाद केले तर शेवटच्या षटकात कार्तिक मिश्राला बाद करून मुंबई पोलिसांचा विजय साकारला. सुनील पाटीलने १५ धावांत ४ बळी अशी मोलाची कामगिरी करून संघाच्या यशात सिंहाचा वाटा उचलला. योगेश पाटील आणि रोहित बेहरे यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले.

अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम गोलंदाज म्हणून मुंबई पोलिसांच्या आर्यराज निकम (२१४ धावा आणि १३ बळी) याला गौरविण्यात आले. सर्वोत्तम फलंदाज म्हणून सुवेद पारकर (३४४ धावा) आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून हार्दिक तामोरे ८ झेल (दोघेही शिवाजी पार्क वॉरिअर्सचे) यांना गौरविण्यात आले. विजेत्या संघाला एक लाख रोख आणि चषक तर उपविजेत्या संघाला रुपये ५० हजार रोख आणि चषक देऊन गौरविण्यात आले. अंधेरीचे आमदार मंगेश कुडाळकर, एमसीएचे संयुक्त सचिव दीपक पाटील, मुंबईच्या सिनियर निवड समितीचे चेअरमन संजय पाटील, माजी क्रिकेटपटू संतोष सक्सेना, ज्वाला सिंग, ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सत्येंद्र सिंग त्यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई पोलिस सिटी रायडर्स ः २० षटकांत ६ बाद २२१ (सुनील पाटील ३१, आर्यराज निकम ८०, हर्ष आघाव ३७, रोहित पोळ नाबाद २७; साईराज पाटील ४१ धावांत २ बळी) विजयीविरुद्ध शिवाजी पार्क वॉरियर्स ः १९.५ षटकात सर्वबाद २१७ (वरुण लवंडे ३७, हार्दिक तामोरे २१, अग्नी चोप्रा ५८, सिद्धांत सिंग ५२, सुनील पाटील १५ धावांत ४ बळी, योगेश पाटील २८ धावांत २ बळी, रोहित बेहरे ४७ धावांत २ बळी). सामनावीर ः आर्यराज निकम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *