
मुंबई ः महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत शालेय खेळाडूंच्या विनाशुल्क सुपर लीग कॅरम स्पर्धेमध्ये सिबिईयु वॉरीयर्स, गोविंदराव मोहिते फायटर्स, एमडीसी ज्वेलर्स, सुरेश आचरेकर फायटर्स आदी संघातील खेळाडूंनी सलामीचे सामने जिंकले.
उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू प्रसाद माने व सारा देवन यांच्या विजयी खेळामुळे सिबिईयु वॉरीयर्सने घोष फेअर प्ले संघाला २-१ असे चकविले. आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-सिबिईयु व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित स्पर्धेचा शानदार उद्घाटन माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, प्रदीप पाटील, प्रमोद पार्टे, जनार्दन मोरे आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
दादर-पश्चिम येथील सिबिईयु सभागृहात गोविंदराव मोहिते फायटर्सच्या पुष्कर गोळे, युग पडिया, मंदार पालकर यांनी सहज विजय मिळवत अभिजित चँम्पियन्सला ३-० असे हरविले. आनंदराव प्लॅटिनमच्या प्रसन्न गोळे याने राज्य ख्यातीच्या अमेय जंगमला नील गेम देत एमडीसी ज्वेलर्सविरुध्द १-० असा दमदार प्रारंभ केला. परंतु रत्नागिरीच्या स्वरा मोहिरेने देविका जोशीला १६-० असे आणि वेदिका पोमेंडकरने अनय म्हेत्रेला २५-० असे पराभूत करून एमडीसी ज्वेलर्सला २-१ असा चुरशीचा विजय मिळवून दिला. अर्णव गावडेने सुमती क्वीनला मिळवून दिलेली १-० अशी आघाडी जैतापूरच्या आर्यन राऊतने रोखत सुरेश आचरेकर फिनिशर्सला १-१ अशी बरोबरी करून दिली. निर्णायक सामन्यात राष्ट्रीय ख्यातीच्या तनया दळवीने प्रेक्षा जैनला २५-१ असे पराभूत करून सुरेश आचरेकर फिनिशर्सच्या विजयावर २-१ असा शिक्कामोर्तब केला. पंचाचे कामकाज चंद्रकांत करंगुटकर, सचिन शिंदे, संतोष जाधव, अविनाश महाडिक, प्रॉमिस सैतवडेकर आदी पाहत आहेत.