
मुंबई : व्हॅलीयंट फेम आयकॉन आणि जिल्हा सैनिक वेल्फेअर यांच्यातर्फे मुंबईची माजी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू सुवर्णा बारटक्के-पालव हिला नॅशनल अवॉर्ड ऑफ एक्सलन्स इंडिया हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून मुंबईत झालेल्या एका शानदार कार्यक्रमात संस्थेकडून महिला शक्तीकरणाच्या उद्देशाने २५ महिलांना सन्मानित करण्यात आले. यात ठाण्याची जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णाचा समावेश होता.
माजी आमदार यामिनी जाधव यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सुवर्णाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुवर्णाचा २०१२च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात समावेश होता. राष्ट्रीय स्पर्धेत तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व केले आहे.