अखिल भारतीय निमंत्रित व्हॉलिबॉल स्पर्धेत बँक ऑफ महाराष्ट्र महिला संघाला उपविजेतेपद

  • By admin
  • May 2, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

पुणे ः सेंट जोसेफ स्टेडियम, केरळ येथे आयोजित अखिल भारतीय निमंत्रित महिला व्हॉलिबॉल स्पर्धेत बँक ऑफ महाराष्ट्र महिला संघाने चमकदार कामगिरी बजावत उपविजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत भारतभरातील नामवंत सहा महिला व्हॉलिबॉल संघांनी सहभाग घेतला होता. देशातील विविध बँका, ऊर्जा कंपन्या व सरकारी संस्था यांच्या संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली.

बँक ऑफ महाराष्ट्र महिला व्हॉलीबॉल संघाने वरिष्ठ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक देविदास जाधव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. या संघाने साखळी फेरीत दमदार प्रदर्शन करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

अंतिम सामना बँक ऑफ महाराष्ट्र विरुद्ध यजमान केएसईबी (केरळ स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड) संघ यांच्यात खेळवण्यात आला. सामना अत्यंत चुरशीचा ठरला, परंतु केएसईबी संघाने अंतिम लढतीत बँक ऑफ महाराष्ट्र संघावर २५-२२, २५-२१ आणि २५-१२ अशा सरळ सेट्समध्ये विजय मिळवत विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.

बँक ऑफ महाराष्ट्र संघासाठी मारिया सायबी, अनन्या, श्री जानाई आणि रक्षा या खेळाडूंनी विशेषतः उल्लेखनीय खेळी केली. त्यांच्या अचूक सर्व्हिसेस, नेटवरील आक्रमक ब्लॉक्स आणि संघभावना यामुळे संघाने सुरुवातीपासूनच स्पर्धेत आपली छाप पाडली. संघाच्या एकंदरीत सुसंघटित खेळी आणि निर्धारामुळे त्यांना उपविजेतेपद प्राप्त झाले. या स्पर्धेच्या निमित्ताने महिला व्हॉलीबॉलमध्ये नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळाली असून, देशातील महिला व्हॉलीबॉलची पातळी उंचावण्यास हे स्पर्धा उपयुक्त ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *