
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण
बीड ः बीड शहरात महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते जयश्री बारगजे, अविनाश पांचाळ, गौरी मुंदडा, प्रणव सिरसाठ यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती, बीड मार्फत सन २०१९-२० मधील जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते १ मे रोजी पोलीस मुख्यालय बीड येथे करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी दिली.

पोलिस मुख्यालय बीड येथे महाराष्ट्र दिनाच्या शासकीय ध्वजारोहन प्रसंगी उद्योग व सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते तायक्वांदो खेळाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश भरत पांचाळ (गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार), तायक्वांदो प्रशिक्षक जयश्री अविनाश बारगजे (गुणवंत क्रीडा संघटक / कार्यकर्ती पुरस्कार), राष्ट्रीय शालेय तायक्वांदो सुवर्णपदक विजेती खेळाडू गौरी कमलेश मुंदडा (गुणवंत खेळाडू पुरस्कार महिला) व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता तायक्वांदो खेळाडू प्रणवकुमार दत्ता सिरसाठ (गुणवंत खेळाडू पुरस्कार) यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व प्रत्येकी १० हजार रूपये रोख देऊन जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्स, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने, जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, महाराष्ट्र राज्य तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबईचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०१९-२० चे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा अधिकारी अनिकेत काळे, कालिदास होसूरकर, क्रीडा मार्गदर्शक सतीश राठोड, अविनाश पाटील, रेवननाथ शेलार, धनेश करांडे, जितेंद्र आराक, त्रिगुणा वाघमोडे, प्रीती काळे यांनी परिश्रम घेतले.