
रेल्वेची स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धा ः भगवंत अदलिंगे सामन्याचा मानकरी
सोलापूर ः मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूटचा ७८व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेतील अ गटाच्या सामन्यात शुक्रवारी बार्शीच्या बीटीसीए संघाने सोलापूर स्पोर्ट्स संघाचा पाच गडी राखून पराभव केला.
येथील रेल्वे मैदानावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या सोलापूर स्पोर्ट्स संघाचा डाव बार्शीने १०७ धावांत गुंडाळला. विजयी १०८ धावांचे लक्ष्य बार्शी संघाने पाच गडी गमावत गाठले. नाबाद ४३ धावा व १ बळी टिपणारा भगवंत अदलिंगे सामन्याचा मानकरी ठरला.
पीडब्लूआय अधिकारी महिंद्रकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. प्रत्येक सामनावीर पुरस्कार सुदेश व सुनील मालप यांच्याकडून देण्यात येत आहेत. पंच म्हणून दयानंद नवले व नितीन गायकवाड तर गुणलेखक म्हणून सचिन गायकवाड यांनी काम पाहिले.
संक्षिप्त धावफलक
सोलापूर स्पोर्ट्स ः २९ षटकांत सर्वबाद १०७ (निखिल दोरनाल ३३, समर्थ दोरनाल १५, विवेक दुगम ३ बळी, अमर शेंडगे व पार्थ लोंढे प्रत्येकी २ बळी, सचिन घाडगे, भगवंत आदलिंगे, रेहान शेख प्रत्येकी १ बळी) पराभूत विरुद्ध बीटीसीए बार्शी ः २६.२ षटकांत ५ बाद १०९ (भगवंत आदलिंगे नाबाद ४३, प्रतीक चव्हाण १८, प्रणव ठोंगे १४ धावा, निखिल दोरनाल ३ बळी, साई इराबत्ती १ बळी).