
ज्युनिअर गटात सुवर्णपदक, सीनियर गटात कांस्य पदकाची कमाई
पुणे : भारतीय हौशी जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या आयोजित आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पुरूषांच्या सांघिक प्रकारात तब्बल १४ वर्षांनी कांस्यपदकाचा करिश्मा घडविला. यजमान महाराष्ट्राने मुलींच्या ज्युनियर सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले, तर मुलांच्या सांघिक गटात रौप्य पदकाची कमाई केली.

बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या स्पर्धेत पुरुष आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सच्या वरिष्ठ गटातील सांघिक प्रकारात महाराष्ट्राला २०६.३० गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. सिद्धांत कोंडे, ओंकार शिंदे, मनीष गाढवे, हर्ष धुमाळे, आकाश धुवाळी व चैतन्य देशमुख या संघाने महाराष्ट्राला हे कांस्यपदक जिंकून दिले. रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाने सर्वाधिक २१४.३० गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. सर्विसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाने २१३.८५ गुणांसह रौप्यपदकाला गवसणी घातली. तब्बल १४ वर्षांनी महाराष्ट्राने पदक तक्यात स्थान प्राप्त केले. यापूर्वी २०११ मध्ये महाराष्ट्राने पदकाची कामगिरी केली होती.
महिला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेतील ज्युनियर गटातील सांघिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी १५८.७० गुणांची कमाई करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. साक्षी दळवी, कार्या अधिकारी, अलीशा चौधरी, रिद्धी जाट्टी, डियरा मेहता व मुग्धा मोरे यांच्या संघाने हे सोनेरी यश संपादन केले. कर्नाटक संघाला १५१.७० गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर पश्चिम बंगालने १५१.५५ कांस्यपदकाची कमाई केली.
पुरुष आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सच्या ज्युनियर गटातील सांघिक प्रकारात महाराष्ट्राला सुवर्ण पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. कौस्तुभ अहिरे, अनय किर्लोस्कर, प्रसून अमळनेरकर, प्रिन्स जैन, आध्यान देसाई व कौस्तुभ बेरी या महाराष्ट्राच्या संघाने २७१.४५ गुणांची कमाई करीत रौप्यपदक जिंकले. पश्चिमी बंगालने २७२.२५ गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर उत्तर प्रदेश संघाला २६९.२५ गुणांसह कांस्यपदक मिळाले. महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, सचिव मकरंद जोशी व स्पर्धा संचालक प्रवीण ढगे यांनी महाराष्ट्राच्या पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
कोट
आगामी स्पर्धांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला ही नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राला या स्पर्धेची यजमानपद मिळाले आहे. या स्पर्धेत मुलांच्या गटात २२ राज्यांचे, तर मुलींच्या गटात १७ राज्यातील संघ असे एकूण ७०० खेळाडू सहभागी झाले आहेत.
- संजय शेटे, अध्यक्ष, महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक असोसिएशन.