
पुणे ः जगद्ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या ८९१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध गिर्यारोहक उमेश झिरपे यांना ‘वीर शैव भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार लातूरचे आमदार डॉ शिवाजीराव काळगे व उल्हास दादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी संजय बालगुडे, अभय छाजेड, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन प्रमुख प्रा श्यामा ताई घोणसे, विश्वेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल शेठ गाडवे, सुनील रुकारी, महाराष्ट्र वीर शैव संघाचे कार्यवाह नरेंद्र वरसरे यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.
खासदार काळगे आणि उल्हास दादा पवार यांनी गिर्यारोहण क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल उमेश झिरपे यांचे अभिनंदन केले. झिरपे हे गेल्या ४ दशकांपासून गिर्यारोहणासारख्या साहसी खेळांना अथकपणे प्रोत्साहन देत आहेत आणि समाजाला त्याचे महत्त्व समजावून सांगत आहेत,” असे उल्हास पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
“या पुरस्काराने मला अधिक ऊर्जा आणि जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रोत्साहनाने मी भारावून गेलो आहे आणि हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ एक पुरस्कार नाही तर गिर्यारोहण या साहसी खेळासाठी एक सामाजिक ओळख आहे,” अशा भावना उमेश झिरपे यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र व्यवहारे यांनी केले आणि नरसिंग मुळे यांनी आभार मानले.