
भंडारा ः भंडारा येथे रविवारी (४ मे) तीन राष्ट्रीय नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धांसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती महाराष्ट्र नेटबॉल महासचिव डॉ ललित जीवनी यांनी दिली.
अल्पाइन अकादमी, इंदौर (मध्य प्रदेश) येथे तीन वेगवेगळ्या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धा २५ ते ३१ मे या कालावधीत आयोजित केल्या जात आहेत. ३१ वी सब-ज्युनियर राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धा (२५-२८ मे), चौथी फास्ट फाइव्ह सब-ज्युनियर राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धा (२८ ते ३० मे) आणि दुसरी सब-ज्युनियर मिक्स राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धा (३० ते ३१ मे) होणार आहे.
या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी ४ मे २०२५ रोजी भंडारा जिल्ह्यातील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल येथे निवड चाचणी घेण्यात येणार आहे. निवड चाचणी दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. सकाळी सत्र ६ ते ९ आणि दुपारी सत्र ४ ते ७ अशा दोन सत्रात चाचणी होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र अम्युचर नेटबॉल असोसिएशनचे महासचिव डॉ ललित जीवनी यांनी दिली व निवडलेल्या खेळाडूंचे राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरही २० मे २०२५ पासून त्याच ठिकाणी सुरू होईल, असे सांगितले.
निवड चाचणी संदर्भात माहितीसाठी प्रशिक्षक अंजली कुंभारे, वरिष्ठ राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू गौरव भुरे (७०६६५९८४०८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.