
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने एका शानदार सोहळ्यात गौरवले
कोलकाता ः मोहन बागान सुपरजायंट्सचा कर्णधार सुभाषिश बोस याला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रतिष्ठित एआयएफएफ सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारतीय डिफेंडर आणि मोहन बागान सुपरजायंट्स संघाचा कर्णधार सुभाषिश बोस याला शुक्रवारी एका संस्मरणीय हंगामानंतर वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले तर ईस्ट बंगाल एफसीची स्ट्रायकर सौम्या गुगुलोथ हिने महिला गटात हा पुरस्कार जिंकला. बोस यांच्या नेतृत्वाखाली मोहन बागान सुपरजायंट्स संघाने एकाच हंगामात ‘लीग विनर्स शील्ड’ आणि ‘आयएसएल कप’ दोन्ही जिंकून इंडियन सुपर लीग (आयएसएल) मध्ये ऐतिहासिक दोन जेतेपदे जिंकली. गेल्या महिन्यात झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी बेंगळुरू एफसीवर २-१ असा विजय मिळवला. यामुळे २०२०-२१ मध्ये मुंबई सिटी एफसी नंतर मोहन बागान आयएसएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा दुसरा संघ ठरला.
खालिद जमील वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात जमशेदपूर एफसीचे प्रशिक्षक खालिद जमील यांना सलग दुसऱ्यांदा वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले. इंडियन वुमेन्स लीगमध्ये श्रीभूमी एफसीला तिसऱ्या स्थानावर नेल्याबद्दल सुजाता कर यांना वर्षातील सर्वोत्तम महिला प्रशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मिडफिल्ड मास्टरमाइंड ब्रायसन फर्नांडिसला पुरूषांचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले तर १८ वर्षीय डिफेंडर थोइबिसाना चानू हिला वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार मिळाला. विशाल कैथने पुरुषांच्या गोलकीपर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला तर पंथोई चानूला आयडब्ल्यूएलमधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी महिलांच्या गटात हा पुरस्कार मिळाला. वेंकटेश आर यांना वर्षातील सर्वोत्तम पुरुष पंच म्हणून निवडण्यात आले तर टेकचम रंजिता देवी यांना वर्षातील सर्वोत्तम महिला पंच म्हणून सन्मानित करण्यात आले. वैरामुथु पी यांना वर्षातील सर्वोत्तम पुरुष सहाय्यक पंच म्हणून निवडण्यात आले तर रिओहलांग धर यांना वर्षातील सर्वोत्तम महिला सहाय्यक पंच म्हणून निवडण्यात आले.